शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि नाशिक शहरमधील महत्त्वाचा चेहरा असलेले सुधाकर बडगुजर हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सुधाकर बडगुजर यांनी सोमवारी, नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आपण शहरातील समस्यांबाबत फडणवीसांना भेटलो असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी आपण पक्षात नाराज आहोत, असे म्हटले. जिल्ह्यात पक्षाच्या नियुक्तीत विश्वासात घेण्यात आले नव्हते असेही त्यांनी म्हटले.
advertisement
ठाकरे गटाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषद बोलावली. या पत्रकार परिषदेला महानगरप्रमुख विलास शिंदे, खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते सुनील बागुल, उपनेते दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गीते आदी उपस्थित होते. मात्र, बडगुजर यांनी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे सांगत पत्रकार परिषदेला येणे टाळले.
जिल्हाप्रमुख सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत भाजप नेते गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध केला. भाजपवर त्यांनी टीका केली. तर, सलीम कुत्ता प्रकरणात ज्यांच्यावर आरोप केले ते बडगुजर आता भाजपला प्रिय का होऊ लागेल अशा आशयाचे वक्तव्य केले. त्यामुळे भाजपचे आरोप खोटे असतील असे म्हटले.
पक्षविरोधी कारवाईचा ठपका...
पत्रकार परिषद सुरू असताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची फोनवरून बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी करत असल्याचे सांगितले.
ज्यांच्या नाराजीचा उल्लेख ते शिंदे पत्रकार परिषदेत...
मंगळवारी बडगुजर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपणचं नव्हे तर विलास शिंदे आणि इतर 12-14 जण नाराज असल्याचे वक्तव्य केले. मात्र, आजच्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी उपस्थिती लावत आपण नाराज नसल्याचे म्हटले. पक्षातील काही मुद्दे असतील तर आपण शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत बोलून आणि पक्षातच चर्चा करून सोडवू, त्याला जाहीर काही मांडण्याची गरज नसल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.