मुंबई : राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, तब्बल दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा साखरेचे वितरण सुरू होण्याच्या मार्गावर आहे. शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून आवश्यक साखर उपलब्ध झाल्याने रेशन दुकानांमधून प्रतिमहिना अंत्योदय कार्डमागे एक किलो साखर देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अत्यंत गरीब आणि गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.
advertisement
बंद होण्याचे कारण काय?
मागील दीड वर्षांपासून साखरेच्या टेंडर प्रक्रियेअभावी रेशन दुकानांमधून साखर वितरण पूर्णपणे बंद होते. परिणामी अंत्योदय योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या हजारो कुटुंबांना बाजारातून महाग दराने साखर खरेदी करावी लागत होती. खुल्या बाजारात साखरेचा दर सध्या 44 ते 45 रुपये प्रतिकिलो असून, रेशन दुकानातून मात्र केवळ 20 रुपये प्रतिकिलो दराने साखर मिळते. त्यामुळे रेशनमधील साखर बंद राहिल्याचा मोठा आर्थिक फटका लाभार्थ्यांना बसला होता.
निर्णय काय?
आता मात्र नोव्हेंबर व डिसेंबर 2025 तसेच जानेवारी 2026 या तीन महिन्यांसाठी साखरेचे नियतन शासनाकडून मंजूर करण्यात आले आहे. यासाठी सुमारे पाच हजार क्विंटल साखर जिल्हा पुरवठा विभागाला उपलब्ध करून देण्यात आली असून, ही साखर सध्या विभागाच्या गोदामांमध्ये दाखल झाली आहे. सध्या एका महिन्याचे नियतन मिळाले असून, त्यानुसार टप्प्याटप्प्याने वितरणास सुरुवात करण्यात येत आहे.
सण-उत्सवांच्या काळातच बहुतेक सामान्य व गरीब कुटुंबांमध्ये गोड पदार्थ बनवले जातात. त्यामुळे रेशनमधील साखर ही त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते. गेल्या दीड वर्षांपासून साखर न मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांना मर्यादांमध्ये सण साजरे करावे लागले. आता साखरेचा पुन्हा पुरवठा सुरू झाल्याने यंदा नववर्षाच्या आधीच या कुटुंबांच्या आयुष्यात गोडवा परतल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
राज्यात एकूण 87 हजार 064 अंत्योदय कार्डधारक असून, या सर्व लाभार्थ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. लाभार्थ्यांना साखर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून वारंवार शासनाकडे मागणी करण्यात येत होती. अखेर शासनस्तरावर हालचाली होऊन साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले, त्यामुळे रखडलेला प्रश्न मार्गी लागला आहे.
