महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारासाठी सुजात आंबेडकर सोलापुरात आले होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. आपल्या विरोधात भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूलाही भाजपच आहे, कारण प्रणिती शिंदे ह्या भाजपसाठी काम करतात हे सर्वांना माहितीय, असे ते म्हणाले.
निवडणूक संपताच प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार
महापालिका निवडणुकीच्या आधी प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातच त्या भाजपमध्ये जाणार होत्या. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले की तीन महत्वाच्या निवडणुका येतायत. नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत तुम्ही काँग्रेसमध्येच थांबा. सेटिंग करून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणा. आता महापालिका-जिल्हा परिषद निवडणूक सरताच प्रणिती ताई काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करतील. प्रणितीताई आणि देवेंद्र फडणवीस यांची डील झालेली आहे, असे सुजात आंबेडकर म्हणाले.
advertisement
सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार हे भाजपसाठी काम करतात हे अख्या जगाला कळून चुकलंय
तुम्हाला भाजपला पाडायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय तुमच्या समोर आहे. यांची भाजपसोबतची नाती खूप लांबपर्यंत आहेत. दोन ते तीन महिन्यांपूर्वी सुशील कुमार शिंदे यांची नात दिया श्रॉफच्या लग्नात शरद पवार, गौतम अडाणी आणि देवेंद्र फडणवीस हे तीन प्रमुख पाहुणे होते. हे भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर रस्त्यावर लढायचे नाटक करतात. मात्र यांचे बिजनेस एक, यांची लग्न एक, यांचे नातेगोते एक, यांचे सर्व धंदे एक आणि प्रणिती ताईने प्रवेश घेतला की यांचा पक्ष सुद्धा एक.... म्हणून काँग्रेसच्या नादाला लागू नका, तुम्ही काँग्रेसला मत दिले म्हणजेच भाजपाला मत दिल्यासारखे होते. सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार हे भाजपसाठी काम करतात हे अख्या जगाला कळून चुकलं आहे, असे सुजात आंबेडकर म्हणाले.
