भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या पवित्र्याची महायुतीच्या मंत्र्यांनी धास्ती घेतली नाही तरचं नवलं. कारण मुनगंटीवार प्रत्येक मुद्दा अत्यंत आक्रमकपणे सभागृहात मांडताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या तडाख्यातून ना स्वपक्षिय ना मित्र पक्षाचा मंत्री सुटला आहे. विदर्भासाठी निधीची योग्य वाटप होत नसल्याची आणि नोकरीतील तरतुदीनुसार संधी दिली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, रेती माफियांचा वाढता प्रभाव आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवरही त्यांनी सरकारला प्रश्न विचारले.
advertisement
जयकुमार गोरेंचेही सुधीर मुनगंटीवारांनी कान टोचले
इकडं भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंचेही सुधीर मुनगंटीवारांनी कान टोचले. समुदाय संसाधन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना मुनगंटीवारांनी मंत्री गोरेंना काँग्रेसच्या कारभाराची आठवण करुन देत घरचा आहेर दिला. मुनगंटीवार एवढ्यावरचं थांबले नाहीत त्यांनी आपल्या मनातील ही खंत बोलून दाखवली. त्यामुळे स्वपक्षिय मंत्र्याची सभागृहात चांगलीचं कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.
सुधीर मुनगंटीवार सभागृहात प्रचंड संतापले
आमदार सभागृहात उपस्थित असताना जे मंत्री उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर बिबट्या सोडा, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना निधी मिळत नसल्याने सुधीर मुनगंटीवार सभागृहात प्रचंड संतापलेले बघायला मिळाले.
मुनगंटीवारांचा आक्रमक पवित्रा
मराठवाड्यातील भाजपचे मंत्री अतुल सावेही मुनगंटीवारांच्या तडाख्यातून सुटले नाहीत. सुधीर मुनगंटीवर हे भाजपमधील वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी यापूर्वी राज्याचे वनमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. पण यावेळी मात्र त्यांना मंत्रिमंडळात संधी काही मिळाली नाही. पण आता ते भलेही सत्ताधारी बाकावर असले तरी त्यांचा हा पवित्रा पाहून ते विरोधी बाकावर तर नाही ना असा सत्ताधाऱ्यांनाच भास झाल्याशिवाय राहणार नाही..
