लातूरमध्ये आंदोलन करणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचा अखेर राजीनामा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने सुरज चव्हाण यांचा राजीनामा झाल्याची असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. सुरज चव्हाण यांची हकालपट्टी करावी यासाठी राज्यभर छावा संघटनेने आज आंदोलन केले. त्यानंतर आज धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुरज चव्हाण यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासाठी सुनील तटकरे आज धाराशिवमध्ये आले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली आहे.
advertisement
पक्ष त्यांच्यासंदर्भात योग्य निर्णय घेईल, दादा कृषिमंत्र्यांना घरी पाठवणार?
बळीराजा संकटात असताना कृषि मंत्रिपदासारखे अतिशय महत्त्वाचे आणि संवेदनशील खाते असणाऱ्या मंत्र्याने शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेऊन काम केले पाहिजे. त्यांच्याकडून जे वर्तन झाले ते अत्यंत अयोग्य झाले, पक्ष त्यांच्यासंदर्भात योग्य निर्णय घेईल, असे सुनील तटकरे म्हणाले.
सुनील तटकरे यांनी कृषिमंत्री कोकाटे यांचे कान उपटले
काहीवेळेला माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात अतिशय चुकीची वक्तव्ये केली. या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना निश्चित समज दिली. त्यांनी पीकविमा आणि कर्जमाफीसंदर्भात जेव्हा वादग्रस्त वक्तव्ये केली होती, तेव्हाही त्यांना अजित पवारांनी समज दिली होती. काल त्यांनी रमी खेळतानाच्या व्हिडीओवर जो खुलासा केला तो ही अत्यंत चुकीचा होता. शेतकरी संकटात असताना कृषीमंत्र्यांनी अशाप्रकारे वागणे योग्य नाही, अशा शब्दात तटकरे यांनी कोकाटे यांचे कान उपटले.
कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा होणार असल्याचेच संकेत
माणिकराव कोकाटे यांचे गेल्या काही महिन्यातले वर्तणूक अत्यंत असंवेदनशील होते. विधिमंडळात पत्ते खेळतानाचा व्हिडिओ ही अतिशय गंभीर बाब आहे, असे सांगत तटकरे यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार असल्याचेच संकेत दिले.
