मुंबई : बिहार निवडणूक निकालांची धामधूम सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात काही काळ खळबळ उडाली. निकालांच्या दिवशी झालेली ही भेट राजकीय कारणांसाठी असल्याचा अंदाज काही जणांनी बांधला. मात्र, प्रत्यक्षात भेटीमागे एक वेगळच कारण असल्याचे समोर आले आहे.
advertisement
बिहार निवडणुकीत एनडीएने विजय मिळवल्यानंतर केंद्रातीलही समीकरणे बदलणार आहेत. बिहारमध्ये सुरू असलेल्या मतमोजणीच्या कलानुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हे आहेत. भाजप आणि चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष यांची एकत्रित संख्या ही बहुमताच्या जवळ आहे. त्यामुळे नितीश यांच्यावरील अवलंबीत्व कमी झाले आहे. याचा परिणाम केंद्रावरही होणार आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर अनेक नवीन राजकीय समीकरणे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चिन्हे आहेत. सुप्रिया सुळेंनी आघाडीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी आता राज्याच्या राजकारणातही एकत्र येणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक समीकरणांची जुळवाजुळव सुरू असतानाच सुप्रिया सुळे आज वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या.
सुप्रिया सुळे ‘वर्षा’वर दाखल कारण काय?
सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे युवा नेते आणि भाचा युगेंद्र पवार यांच्या विवाहसोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी वर्षा बंगल्यावर आल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लग्नाची पत्रिका देत आमंत्रित केले. भेटीत कोणती राजकीय चर्चा झाली का, याबाबत दोन्ही बाजूंनी भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र बिहारच्या राजकीय वातावरणात तापलेल्या दिवशी सुळे यांच्या आगमनामुळे वर्षा बंगल्यावर काही काळ तरी उत्सुकता निर्माण झाली होती. निमंत्रण भेट असल्याचे स्पष्ट झाले असले तरी या भेटीच्या वेळेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते.
