काही जणांनी हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप केलेल्या आहेत. काही ठिकाणी या प्रकरणावरून मारहाणीसारखे प्रकार झाले असे राष्ट्रवादीचे नेते, आमदार जयंत पाटील म्हणाले. त्यावर आक्षेप घेऊन सुरेश धस तावातावाने जयंत पाटील यांना उत्तर द्यायला उभे राहिले. जामखेड मतदारसंघात एका ठिकाणी डुकराचे मटण आणि दारू मिळते, तिथे मारामारी झाली. असल्या प्रकरणात मीच मारहाण केली असे माझ्यावर आरोप केले जातात, असे सुरेश धस म्हणाले. त्यांच्या बोलण्यातल्या जामखेड मतदारसंघात डुकराचे मटण मिळते, या वाक्यावर रोहित पवार यांनी आक्षेप नोंदवला.
advertisement
रोहित पवारांचा आक्षेप, अध्यक्षांनी तो शब्द रेकॉर्डवरून काढला
विधानसभेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सभागृहात बोलताना जामखेडचा बदनामीकारक उल्लेख केला होता. जामखेडमध्ये डुकराचे मटण मिळते, असे ते म्हणाले. यासंदर्भात तातडीने तालिका अध्यक्षांना विनंती करून संबंधित बदनामीकारक उल्लेख रेकॉर्डवरून काढण्याची विनंती केली आणि ती विनंती अध्यक्ष महोदयांनी मान्य केली याबाबत त्यांचे आभार! कर्जत जामखेड ही पुण्यभूमी असून इथल्या मातीची बदनामी कोणीही केली तरी ती कदापि सहन केली जाणार नाही, असे रोहित पवार म्हणाले.
सुरेश धस आणि रोहित पवार जुंपली
सुरेश धस आणि रोहित पवार यांच्यामध्ये मतदारसंघाच्या बदनामीवरून जुंपली. यावेळी सुरेश धस यांनी एक पाऊल मागे घेऊन मतदारसंघाच्या बदनामीचा माझा उद्देश नसल्याचे सांगत तो शब्द मागे घेत असल्याचे सांगितले. जयंत पाटील यांनीही याप्रकरणात सुरेश धस यांना चिमटे काढले. मी कुणाचेही नाव न घेता भाषण केले. परंतु अंगावर कसे ओढून घ्यायचे, याचा वस्तुपाठ आज सुरेश धस यांनी घालून दिल्याचे जयंत पाटील म्हणाले. त्यावर सुरेश धस यांच्या चेहऱ्यावरही स्मित हास्य होते.
