काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी पक्षाची तयारी आणि नियोजनासाठी धाराशिव जिल्ह्याचे समन्वयक नेते राजन साळवी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्यात पक्षाचे निवडणूक विषयक नियोजन राहिले बाजूला परंतु आपल्या नेत्याचा फोटो नाही, हे पाहून सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
तानाजी सावंत यांचा फोटो का नाही? कार्यकर्ते आक्रमक
advertisement
राजन साळवी हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बैठकीनिमित्त जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर तसेच बैठकीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर आमदार तानाजी सावंत यांचा फोटो नसल्याने सावंत समर्थक आक्रमक झाले होते.
तानाजी सावंत यांचा फोटो का नाही? असा जाब त्यांनी बैठकीआधीच शिवसेनेच्या दुसऱ्या गटाला विचारला. एवढेच नाही तर आम्ही राजन साळवी यांनाही याबद्दल विचारू, असे म्हणत काही वेळ राडा घातला. पालकमंत्री असताना सावंत यांनी सगळ्यांना मानसन्मान दिला मात्र आता ते पालकमंत्री नाहीत तर त्यांनाच डावलण्याचे प्रयत्न होतायेत का? असा सवाल सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी विचारला.
साळवींकडून नाराजी दूर करण्याची प्रयत्न
राजन साळवी शासकीय विश्रामगृह येथे आले असता सावंत यांचे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत असल्याने नेमका विषय समजावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सावंत यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न साळवी यांनी केला.
