तासगाव कवळे महाकाळ मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात भाजपकडे राहील अशी शक्यता होती. पण हा मतदारसंघ भाजपने अजित पवारांसाठी सोडला आहे. आता तासगांवात घड्याळ विरुद्ध तुतारी असा सामना होणार आहे आणि आर आर आबांचे एके काळचे प्रतिस्पर्धी माजी खासदार संजय काका पाटील विरोधात उभे राहण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे आणि अजित पवारांच्या डिप्लोमसीने त्यांच्या पक्षातील प्रबळ आमदारांचं पाठबळ मिळवून संजय काका पाटील रोहित पाटील यांच्यासमोर उभे राहू शकतात. तसं झालं तर आबांच्या मुलासाठी सोपी वाटणारी निवडणूक अवघड होऊ शकते.
advertisement
तासगांव कवळे महाकाळ विधानसभा मतदारसंघ इतिहास
मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार, तासगांव-कवठे महांकाळ मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुका आणि तासगांव तालुका (विसापूर महसूल मंडळ वगळून) यांचा समावेश होतो. तासगाव कवठेमहाकाळ मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
1991 पासून आर आर आबांची पकड राहिलेला तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघ आबांच्या निधनानंतरही त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी राहिला आहे. दिवंगत आबांची पत्नी सुमन पाटील कवठे महांकाळच्या विद्यमान आमदार आहेत. गेल्या वेळी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवून निवडून आलेल्या पाटील आता शरदचंद्र पवार गटाच्या समर्थक असल्याने मुलगा रोहित पाटीलसुद्धा घड्याळ चिन्हाच्या विरोधात तुतारी घेऊन लढेल.
रोहित पाटील गेली तीन वर्षं विधानसभेची तयारी करत आहेत. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या आणि भाजपचे 10 वर्ष खासदार राहिलेले संजयकाका पाटील राष्ट्रवादीत सामील होत विधानसभेच्या रिंगणात उतरले.
तासगाव मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. 1990 पासून आर आर पाटील इथून निवडून आमदार झालेले आहेत. संजय काका पाटील पहिल्यापासून आर आर पाटील यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत. आर. आर. पाटील – संजय पाटील यांच्यातील चुरशीच्या लढती राज्याने पाहिल्या आहेत.
अजितदादांची खेळी
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगलीतून भाजपचे उमेदवार असलेले माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अजित घोरपडे यांनी प्रचार केला होता. युती अंतर्गत विरोध संजय काका पाटील यांना भोवला आणि ते लोकसभा निवडणूक हरले. विशाल पाटील यांनी निवडणूक जिंकली. त्यावेळी घोरपडे गटाने काँग्रेसच्या विशाल पाटील यांचा प्रचार केला होता. जाहीर सभांमधून जोरदार आरोप- प्रत्यारोप झाले होते. संजय पाटील ही जिल्ह्याला लागलेली कीड आहे, अशी जहरी टिका करणारे अजित घोरपडे आता मात्र संजयकाका पाटील यांच्या मांडीला मांडी लावून पत्रकार परिषदेत दिसले. अजित पवार यांनी या दोन नेत्यांमध्ये समझोता घडवून आणला. घोरपडे यांनी आता संजयकाका पाटील राष्ट्रवादीचे नेते असल्याचं सांगत एकदिलाने प्रचाराला सुरुवात केली आहे. रोहित पाटील यांच्यासमोर तगडं आव्हान निर्माण केलं आहे.
मी अजितदादा गटात प्रवेश केल्यामुळे भाजप आणि आमच्यात कोणतीही धुसफुस नसेल. सर्वच कार्यकर्ते एकत्र येत निवडणूक लढवणार आहेत, असं संजयकाका पाटील यांनी म्हटलं आहे.
2024 लोकसभा निवडणुकीत काय झालं?
तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. सांगली मतदारसंघावर काँग्रेसची मजबूत पकड होती. लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात सांगलीची जागा फक्त दोन वेळा भारतीय जनता पक्ष जिंकू शकला आहे. संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत 2014 ची निवडणूक लढवली आणि सांगलीवर भाजपने विजय मिळवला. 2019 लोकसभा निवडणुकीतसुद्धा संजयकाका पाटील विजयी झाले. पण 2024 ला महायुतीला फटका बसला आणि अपक्ष म्हणून उभे राहिलेले काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील सांगलीचे खासदार झाले.
महाविकास आघाडीतील बेबनाव सांगलीत समोर आला होता. कोल्हापूरची जागा सोडली म्हणून सांगलीतून उद्धव ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करून टाकली. वास्तविक सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंड केलं आणि विशाल पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले आणि निवडून आले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे विशाल हे नातू. त्यांच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची मतं भाजपच्या संजयकाका पाटील यांना मिळाली होती. सेना उमेवार चंद्रहार पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. आता संजयकाका तासगांवातून विधानसभेच्या रिंगणात आहेत आणि आबांच्या मुलाला शह देणार आहेत.