ठाणे शहराचा विकास करायचा असेल तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA च्या धर्तीवर ठाणे आणि जिल्ह्याकरीता ठाणे महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना करा अशी मागणी भाजपाने केल्याने ठाणे जिल्ह्यात एकच राजकीय खळबळ उडालीये.
याचे कारण म्हणजे ठाण्यात आणि ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला छेद देण्यासाठी भाजपाने ही मागणी केलीये जेणेकरुन पालिका जरी शिवसेनेच्या हातात असली तरी TMRDA च्या माध्यमातून भाजपा ठाणे मनपासह ठाणे जिल्ह्यातील सर्व मनपा आणि विकासकामांवर आपला अंकुश ठेवू शकतो. या मागणीमुळे ठाणे जिल्ह्यात विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
advertisement
ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी ही मागणी केली आहे. एवढंच काय तर त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देखील लिहिलं आहे.
उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पत्रात काय म्हटलंय?
- MMRDA च्या धर्तीवर TMRDA ची स्थापना करा
- TMRDA समितीची प्रमुख उद्दिष्टे
- विकास आराखडा (DP) नियंत्रण: शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनवर बारीक लक्ष ठेवून त्याची पारदर्शक अंमलबजावणी करणे
- जनहितकारी धोरणे: बिल्डरधार्जिण्या निर्णयांना चाप लावून सर्वसामान्यांच्या हिताची गृहनिर्माण धोरणे राबवणे
- भ्रष्टाचार निर्मूलन: शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराला लगाम लावून कामात पारदर्शकता आणणे
- ज्वलंत प्रश्नांवर तोडगा: अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधणे
- हॅपी इंडेक्समध्ये वाढ: नागरी सोयीसुविधांचा दर्जा सुधारून ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्यावर भर देणे
टीएमआरडीएच्या स्थापनेची गरज त्यांनी पत्रातून व्यक्त केली असली तरी त्यामागचे राजकीय हेतू वेगळे आहेत. भाजपच्या नेते पदाधिकाऱ्यांना ताकद देऊन त्यामाध्यमातून शिंदेंची ताकद कमी करण्याचा मानस भारतीय जनता पक्षाचा असू शकतो, असे राजकीय जाणकार सांगतात.
