ठाणे, कल्याण-डोंबिवली साठी मागील काही दिवसांपासून अगदी पहाटेपर्यंत बैठका सुरू आहेत. मात्र अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. अशात आता भाजपनं शिवसेनेला शेवटचा अल्टीमेटम दिल्याची माहिती आहे. तोडगा काढण्यासाठी अवघा एकच दिवस दिल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. आज शिवसेनेनं बैठकीचं आमंत्रण दिलं नाही तर भाजप स्वबळावर निवडणूक लढवेन आणि तशा सूचना उमेदवारांना देण्यात येतील, अशा शब्दात भाजपनं शिंदेंना सांगितल्याची माहिती आहे.
advertisement
ठाणे महानगरपालिके भाजपाने काही ठिकाणी प्रचाराला देखील सुरुवात केलीय. ठाण्यात जवळपास १६ ठिकाणी ठाणे भाजपाच्यावतीने बॅनरबाजी करण्यात आलीये. विविध केंद्रीय आणि राज्य सरकारच्या योजनांचा उल्लेख या बॅनरवर असून एक प्रकारे ठाणे भाजपाने निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकलंय. शिवसेनेकडून अजून अंतिम प्रस्ताव आला नसल्याने आणि प्रचाराकरता थोडाच वेळ उरल्याने भाजपाने स्वतंत्र प्रचार सुरू केला आहे. यामुळे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे काल रात्री रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तिसरी बैठक झाली. पहाटे चार वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. या बैठकीत दोन स्थानिक नेत्यांमध्ये घमासान झाल्याची माहिती आहे. बैठकीचा हा सिलसिला सुरू असला तरी अंतिम जागावाटप अद्याप झालं नाही. १९ तारखेनंतर सेनेकडून जागावाटपाबाबत कोणताही प्रस्ताव भाजपला आला नाही. स्थानिक नेत्यांमध्ये अजूनही बैठक झाली नाही.
ठाण्यात मोठा भाऊ म्हणून शिवसेना ८७ ते ९२ जागा लढवेन. तर लहान भाऊ म्हणून भाजप ३५ ते ४० जागा लढवेन. काही जागांवर उमेदवारांची अदलाबदली होण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिकेत ३ ते ५ जागांवर युतीचं घोडं अडून आहे. तर केडीएमसीत ५ ते ७ जागांवरुन भाजपा शिवसेनेत रस्ता खेच सुरु आहे. उद्या रात्री पुन्हा युतीची बैठक होणार आहे. ही बैठक निष्पळ ठरली तर भाजप स्वबळावर मैदानात उतरू शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, उदय सामंत, भाजप नेते रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, नरेश म्हस्के उपस्थित होते.
