पनवेल- कर्जत रेल्वे मार्ग केव्हा होणार सुरु
पनवेल- कर्जत रेल्वे मार्ग 2026 पर्यंत संपूर्ण प्रकल्प सुरु होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे विकास महामंडळाकडून या कामाची गती वाढवण्यात आली असून प्रवाशांसाठी ही मोठी दिलासा दायक बातमी ठरत आहे.
पनवेल आणि कर्जत परिसरात गेल्या काही वर्षांत नागरीकरण वेगाने वाढत आहे. या दोन्ही भागांदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी निर्माण होत आहे. विशेषतः कर्जत, खोपोली, भिवपुरी आणि नेरळ परिसरातील नागरिक रोज मुंबई आणि नवी मुंबईत नोकरीसाठी किंवा व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करतात. सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी या मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये चढणेही कठीण बनते, परिणामी वादाचे तसेच गर्दीचे प्रसंगही वारंवार घडतात.
advertisement
असे असतील नवीन स्थानके
या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पनवेल-कर्जत रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आला. या मार्गिकेवर एकूण पाच स्थानके आहेत जी पनवेल, चिखले, मोहपे, चौक आणि कर्जत ही असतील .
सध्या पनवेल आणि कर्जत दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्थानकावरून किंवा एसटी बसने प्रवास करावा लागतो. हा प्रवास वेळखाऊ आणि त्रासदायक ठरतो. नवीन रेल्वे मार्गिका तयार झाल्यानंतर या प्रवाशांना थेट जोडणी मिळेल, ज्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईकडे जाणारा प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि सुरक्षित होईल.
रेल्वे विकास महामंडळाकडून सांगण्यात आले आहे की, या प्रकल्पातील उर्वरित कामांना गती देण्यात आली असून 2026 पर्यंत सर्व बांधकाम, ट्रॅक, सिग्नलिंग आणि इलेक्ट्रिफिकेशनचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर सुरक्षा चाचण्या, तांत्रिक मंजुरी आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी मिळाल्यानंतर हा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाईल.
