भाजपचा महापौर निश्चित, पण नावावर सस्पेन्स
नाशिक महापालिकेच्या १२२ जागांपैकी भाजपला तब्बल ७२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे भाजपचाच महापौर होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र बहुमत स्पष्ट असले तरी महापौरपदासाठी पक्षांतर्गत स्पर्धा प्रचंड वाढली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापौरपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, त्यामुळे हे पद मिळवण्यासाठी इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
advertisement
सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे पदाला विशेष महत्त्व
नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी महापालिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. विकासकामे, पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक आणि नियोजन या सर्व बाबींमध्ये महापौर आणि स्थायी समितीची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळेच या काळात महापौरपदावर सक्षम आणि अनुभवी नेतृत्व यावे, यासाठी भाजपमध्येही चांगलीच चाचपणी सुरू असल्याचे सांगितले जाते.
निवडणूक निकालांचे संख्याबळ
निवडणूक निकालानुसार भाजप ७२ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) २६, अजित पवार गट ४, काँग्रेस ३, मनसे १ आणि आरपीआय १ जागेवर विजयी झाले आहेत. या संख्याबळामुळे भाजपला महापौरपदासह स्थायी समितीवरही निर्विवाद वर्चस्व मिळणार आहे. दरम्यान, महापौरपदाचा अंतिम निर्णय प्रदेश कोअर कमिटी घेईल, असे स्पष्टीकरण भाजप शहराध्यक्षांकडून देण्यात आले आहे.
भाजपमध्ये अंतर्गत चढाओढ
भाजपमध्ये महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतर्गत चढाओढ अधिक तीव्र झाली आहे. काही नगरसेवक थेट पक्षातील वरिष्ठ नेत्यांपासून ते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत भेटीगाठी घेत असल्याची चर्चा आहे. महापौरपद मिळाले नाही, तरी किमान स्थायी समिती सभापतीपद मिळावे, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
तीन नावांची सर्वाधिक चर्चा
महापौरपदाच्या शर्यतीत सध्या तीन नावांची सर्वाधिक चर्चा होत आहे. भाजपकडून पाचव्यांदा विजयी झालेले ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत खोडे हे अनुभवी आणि संघटनात्मक ताकद असलेले नेते मानले जातात. याआधी त्यांनी तीन वेळा शिवसेना आणि एकदा भाजपकडून निवडणूक जिंकली आहे. तसेच सुप्रिया खोडे आणि माजी आमदार सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप हेही दुसऱ्यांदा निवडून आल्याने त्यांच्या नावालाही महत्त्व दिले जात आहे.
आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष
महापौरपदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याची माहिती आहे. ओबीसी तसेच इतर राखीव गटातील ज्येष्ठ नगरसेवकांनी यासाठी तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतरच महापौरपदाच्या शर्यतीचे चित्र अधिक स्पष्ट होणार असून, नाशिकच्या सत्ताकेंद्रात नेमका कोण विराजमान होणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
