छत्रपती संभाजीनगर : राज्यात महापालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक युती आघाडी करत आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगरमधून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. भाजप आणि शिवसेनेची युती तुटली असल्याची घोषणा मंत्री संजय शिरसाठ यांनी केली आहे.
advertisement
युती असायला हवी होती
मंत्री संजय शिरसाठ यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ''काही स्थानिक नेत्यांनी शिवसेना आणि भाजपची युती तोडली.एकीकडे उमेदवाराला फॉर्म भरायला सांगायचे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चाही केल्या जात होत्या. स्थानिक नेत्यांनी युती तोडायची म्हणून डाव साधला आणि युती तुटली''.
भाजपला अहंकार झाला
शिरसाठ पुढे म्हणाले की, ''युतीसाठी आमच्या 10 बैठका झाल्या मात्र कालपासून त्यांचा फोन आला नाही. ते आमच्याशी बोलतही नाहीत. भाजपनं ठरलेल्या प्रस्तावात मेख मारली. भाजपला आता अहंकार आला आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना फॉर्म भरायला सांगितले आहे, ते आता भरतील. जे झालं ते चुकीच झाले. हा भाजपचा अहंकार आहे. आम्हाला स्थानिक नेत्यांनी खेळवण्याचा प्रयत्न केला आहे. अंधारात ठेवून त्यांनी आपला हेतु साधला आहे. स्थानिक भाजप कार्यकर्ते वेगळे राहिले''.
या घडामोडींमुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात थेट लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता असून, त्याचा फायदा विरोधकांना होईल का, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मुंबईसह राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर केले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत असल्याने सर्वच पक्षांमध्ये जोरदार हालचाल सुरू आहे. सत्ताधारी महायुती असो किंवा विरोधी महाविकास आघाडी, दोन्हीकडे बंडखोरीचे सूर उमटताना दिसत आहेत. यामुळे अधिकृत उमेदवारांसमोर आव्हाने वाढण्याची शक्यता असून, आगामी निवडणूक राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरण्याची चिन्हे आहेत.
