विधानसभेत बोलताना भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी म्हटले की, २०२० मध्ये नागपूर महापालिकेत तुकाराम मुंढे आले. ७ महिन्यात त्यांनी अधिकार नसतानाही स्मार्ट सिटी प्रकल्पात दखल देण्यास सुरुवात केली. कोटींची कंत्राटे मंजूर केली.तुकाराम मुंढेच्या इशाऱ्यावरुन धमक्यांचे फोन आले असल्याचा आरोप खोपडे यांनी केला. आयएएस अधिकाऱ्याचे समर्थक, माणसं आमदाराला धमकी देत असतील तर याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. २० वर्षात २४ बदल्या झाल्या आहेत, असा हा माणूस आहे, कुठंही टिकत नाही, असे खोपडे यांनी म्हटले.
advertisement
काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, कोणत्याही आमदाराला धमकी देणे चुकीचे आहे. हे सहन करता कामा नये. तुकाराम मुंढे यांची नियुक्ती नागपूर महापालिकेत झाली असताना त्यांच्या विरोधात चौकशी झाली होती. महिला आयोगाने मुंडे यांना क्लिन चिट दिली. ज्या महिलांनी तक्रार केली होती, त्यांनाच राष्ट्रीय महिला आयोगाने दंड ठोठावल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. एक अधिकारी नियमाला धरून काम करत असेल तर त्याला दोष देता कामा नये. भ्रष्टाचार करणार्यावर कारवाई करावी. यातील वस्तुस्थिती, सत्यता तपासली पाहिजे. मात्र, आपल्या सोयीसाठी कोणी आरोप करत असतील तर चौकशी झाली पाहिजे असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.
भाजप आमदार प्रवीण दटके यांनी तुकाराम मुंडे यांच्याविरोधातले पत्र वाचून दाखवले. मुंढे यांच्याविरोधात तक्रार आहे. पाच दिवसांचे बाळ असलेल्या महिला अधिकाऱ्याला कामावर रुजू होण्यास सांगितले. दुसऱ्या महिलेला नस्तीवर सही न केल्याने आक्षेपार्ह भाषेत सुनावलं, हे प्रकरण अजूनही महिला आयोगाकडे आहे. त्यावर कोणताही निर्णय झाला आहे. शासनाने या प्रकरणावर निवेदन द्यावे अशी मागणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, तुकाराम मुंढे प्रकरणात कृष्णा खोपडे यांना आलेल्या धमकी प्रकरणाचा गांभीर्याने तपास करणार आहोत. धमकी देणारे कोण आहेत, त्यांच्या मागे कोण आहेत, कोणाच्या इशाऱ्यावरून धमकी दिली, या सगळ्याचा तपास होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर, मुंढे यांच्यावरील आरोपांबाबत सगळी माहिती घेतली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
