घटना नेमकी घडली तरी कशी?
रविवारी (19 ऑक्टोबर)प्रियांका कुंभार या त्यांच्या मैत्रीणीसोबत गुहागर ते रत्नागिरी या मार्गावर प्रवास करत होत्या. बस क्रमांक एमएच 20 बीएल 1682 ही गणेशखिंड परिसरात पोहोचली असताना हा हृदयद्रावक प्रकार घडला. बसमध्ये एकूण प्रवासी 43 असल्यामुळे गाडी गर्दी असून सदर महिलेला कंडक्टरने मागे जाण्यास सांगितले. त्यानंतर महिला मागे न जाता आप्तकालीन दरवाजाला टिकून उभी राहिली. दरम्यान आप्तकालीन दरवाजाच्या हँडलला धक्का लागून दरवाजा उघडला गेला आणि चालत्या गाडीतून महिला खाली पडली.
advertisement
अपघातानंतर तातडीने त्यांना डेरवण येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढे चिपळूण येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. पाच दिवस डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण अखेर प्रियांकाने जीवनाची लढाई हरली. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
प्रियांकाच्या पश्चात पती आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूनंतर पतीवर आणि लहानग्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील अनेकांनी या अपघाताला एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत चौकशीची मागणी केली आहे. एका लहानशा दुर्लक्षामुळे एका संसाराचा गाडा उद्ध्वस्त झाला.
गुहागर-गणेशखिंड मार्गावरील या अपघाताने पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. चालत्या बसमधील आपत्कालीन दरवाजे नीट लॉक नसतील, तर ते जीवघेणे ठरू शकतात याची जाणीव या घटनेने करून दिली आहे. प्रियांका कुंभार यांच्या निधनाने दहिवलीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून इतक्या साध्या अपघातात इतकी मोठी हानी असे शब्द लोकांकडून ऐकण्यास मिळत आहेत.
