मिळालेल्या माहितीनुसार, तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी पुढील दहा दिवस भाविकांना थेट गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराच्या दुरुस्ती कामासाठी आज (गुरुवार, १ ऑगस्ट) दुपारी १२ वाजल्यापासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे. यामुळे भाविकांना फक्त मुखदर्शन घेता येणार आहे.
मंदिरातील गाभाऱ्याला तडे गेल्याने त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. याच कारणामुळे पुरातत्व विभाग आणि मंदिर संस्थांनी मिळून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाभाऱ्याला प्लास्टर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
गाभाऱ्याच्या दुरुस्तीवरून पुणे जिल्ह्यातील राज्य पुरातत्व विभाग आणि केंद्रीय पुरातत्व विभाग यांच्यात काही मतभेद होते. मात्र, आता त्यावर तोडगा काढत काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, देवीच्या मंदिराचे काम पूर्ण होईपर्यंत पुढील दहा दिवस भाविकांना तुळजाभवानी देवीचे दर्शन बंद राहील.
