धाराशिव : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत होती. महायुती आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आत स्पष्ट झाला आहे. दरम्यान, काही ठिकाणी नाराज नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनाही पक्षाने उमेदवारी दिली नाही. यामुळे नाराज झालेल्या मधुकरराव चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मधुकरराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत तुळजापुरात काँग्रेसचा सांगली पॅटर्न राबवणार अशी भूमिका त्यांनी घेतली.
advertisement
धाराशिव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने तुळजापुरातून उमेदवारी न दिल्याने ते नाराज झाले. ९२ वर्षीय मधुकरराव चव्हाण यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी हजारो कार्यकर्त्यांची बैठकही घेतली आणि तुळजापुरात सांगली पॅटर्न राबवण्याचा निर्धार केला. आता काहीही झालं तरी माघार नाही असं मधुकर चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.
आता कोणी कितीही दबाव आणला तरी उमेदवारी अर्ज मागे न घेता आता लढायचं ही भूमिका मधुकर चव्हाण यांनी घेतली आहे. उमेदवारी अर्जासाठी काँग्रेसकडून इच्छुकांसोबत बैठका सुरु असताना मधुकर चव्हाण यांनी नेत्यांकडे उमेदवारी मागितली होती. तेव्हा वयाचा मुद्दा पुढे आला होता. पण मधुकर चव्हाण यांनी आपण आजही इतरांपेक्षा जास्त काम करत असल्याचं सांगितलं होतं.
निवडणुकीत वय हा मुद्दा नसून मी इतरांपेक्षा जास्त काम करू शकतो. मी काँग्रेस स्थापनेपासून पक्षात सक्रिय काम करत आहे. माझ्यापुढे अनेक सिद्धांत झाली. आजही मी इतरापेक्षा जास्त काम करतो त्यामुळे वय हा मुद्दा नसल्याचे सांगत मधुकर चव्हाण यांनी तुळजापूर विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.