तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील अष्टदश महाशक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ मानलं जातं. दररोज हजारो भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मंदिराच्या गाभाऱ्यातील दुरुस्ती आणि शिखर भागाच्या कामांवरून स्थानिकांत आणि भाविकांमध्ये वाद सुरू होता. अखेर पुरातत्व खात्याच्या परवानगीनंतर गाभाऱ्यातील जीर्णोद्धारास सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाची अधिकृत माहिती देण्यासाठी मंदिर संस्थानाने जाहीर प्रगटन जारी केलं आहे. त्यात स्पष्ट करण्यात आलं की, १ ते १० ऑगस्ट या कालावधीत भाविकांनी तुळजापूरला येताना याची नोंद घ्यावी. गाभाऱ्यात देवीच्या मूर्तीच्या आसपास जिर्णोद्धाराचे काम सुरू राहील. त्यामुळे श्रद्धेच्या दृष्टीने कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी मुखदर्शनाची सुविधा सुरु राहणार आहे.
advertisement
या काळात मंदिर प्रशासन भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देणार असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
