राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड कोकणात झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणात मोठा बदल घडवून आणणारी घडामोड कणकवलीत उभी राहिली आहे. शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. ही बैठक ‘शहर विकास आघाडी’ च्या माध्यमातून कणकवलीत भाजपविरोधात आणि राणेंविरोधात आघाडी निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे.
advertisement
होमग्राउंडवर राणेंना घेरण्याची तयारी...
भाजपने सिंधुदुर्गात स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्यानंतर शिवसेनेचे दोन्ही गट ठाकरे गट आणि शिंदे गट स्थानिक पातळीवर एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत दिसत आहेत. कणकवली नगर पंचायत अध्यक्षपदासाठी भाजपकडून समीर नलावडे इच्छुक आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडी आणि शिंदेसेना हातमिळवणी करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.
बैठकीत नगराध्यक्ष पदासाठी ठाकरे गटातील नेते संदेश पारकर यांचे नाव पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, संदेश पारकर यांना शिंदे गटाचा पाठिंबाही मिळू शकतो अशी चर्चा आहे.
वैभव नाईक-निलेश राणे एकत्र?
या सगळ्या घडामोडींमध्ये कणकवलीतील जुन्या प्रतिस्पर्धी राजकारणालाही नवे वळण मिळू शकते. येथे आमदार निलेश राणे आणि माजी आमदार वैभव नाईक एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, कणकवलीत निलेश राणे विरुद्ध नितेश राणे असे ‘गृह युद्ध’ रंगण्याचीही शक्यता दिसून येत आहे. नाईक आणि राणे यांच्यातील वैर मागील अनेक वर्षांपासून आहे. अशातच आता नाईक आणि राणे हे एकत्र येणार असल्याने सगळ्यांचे लक्ष या आगामी निवडणुकीकडे लागले आहे.
आगामी काही दिवसांत या समीकरणाची अधिक स्पष्टता येणार आहे. मात्र, ठाकरे–शिंदे गटाच्या या एकत्र येण्याने कणकवलीचे राजकारण तापण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत.
