कुडाळ मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक हे जाएंट किलर म्हणून ओळखले जातात. नाईक यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दिग्गज नेते नारायण राणे यांचा 10 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. तोपर्यंत नारायण राणे यांचा कोकणात पराभव करणे अशक्य असल्याचे म्हटले जात होते. विधानसभा निवडणुकीत कुडाळ विधानसभा मतदारसंघात यंदा नाईक यांना निलेश राणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
advertisement
वैभव नाईक मातोश्रीवर दाखल...
आज माजी आमदार वैभव नाईक मातोश्रीवर खासदार अरविंद सावंत यांच्यासह दाखल झाले. वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीची काही दिवसांपूर्वी एसीबीने चौकशी केली होती. चौकशीनंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून वैभव नाईक यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यावेळी नाईक यांनी आपण शिवसेना ठाकरे गटासोबत असणार असल्याचे म्हटले. कोकणात अनेक पदाधिकारी ठाकरे गटाची साथ सोडत आहेत. माजी आमदार राजन साळवी यांनी समर्थकांसह ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर भास्कर जाधवांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी वैभव नाईक दाखल झाले आहेत. त्यामुळे या बैठकीत काय घडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे घेणार आमदार-खासदारांची बैठक...
ऑपरेशन टायगरमुळे पक्षाची पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी साथ सोडत असल्यामुळे ठाकरे गटाचे डॅमेज कंट्रोल सुरू झाले आहे. ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची 20 फेब्रवारीला बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार सहभागी होतील. तर खासदारांची 25 फेब्रवारीला बैठक बोलवली आहे. मुंबईत मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. पक्षातील होणारी पडझड रोखण्यासाठी ठाकरे गटाची आमदार आणि खासदारांसोबत संवाद मोहीम सुरू केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
