मागठाणे याठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षीय स्तरावरील कार्यक्रमांना वेग आलेला आहे.
मागाठाणे महोत्सवात २०१२ साली गाऱ्हाणे घातले होते की आपल्या पक्षाचा मुंबईचा महापौर होऊ दे आणि २०१२ ला सुनील प्रभू महापौर झाले. पुढचे मी सांगत नाही पण असेच गाऱ्हाणे आपल्या देवाला घातलेले आहे की यंदाही आपल्या पक्षाचा महापौर होऊ देत. देव आपले नक्की ऐकतो. बोलायचे म्हणून मी बोलत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
advertisement
उद्धव ठाकरे म्हणाले, प्रेमाने बोलवले म्हणूनच या उत्सवाला आलो. महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. आलोय तर सावध करणे माझे काम आहे. आपला मोर्चा झाला, त्यामुळे सर्वांनी सावध राहिले पाहिजे. अन्यथा मुंबईत जेवढे दिसतोय तेवढे पण पुढील पाच वर्षात दिसणार नाही. जुने कार्यकर्ते या ठिकाणी दिसतायत. अजूनही काही आपली माणसे धडपड करत आहेत. संघर्ष म्हटले की मराठी माणूस आठवतो. मागे हटत नाही, अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. तीच जिद्द आणि हिम्मत आपल्याला देवाने दिलेली आहे.
