छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या कार्यक्रमाआधीच मोठी घडामोड समोर आली आहे . उद्धव ठाकरेंच्या सभेआधी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी रशीद मामू यांनी मुख्य स्टेजवर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हस्तक्षेप करत रशीद मामु यांना बाजूच्या व्यासपीठावर जाण्याचे स्पष्टपणे सांगितले.
advertisement
उद्धव ठाकरे येण्याआधीच रशीद मामू मुख्य व्यासपीठावर उपस्थित राहण्याचा आग्रह धरत असल्याचे दिसून आले. मात्र, याला कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेता, रशीद मामू यांना मुख्य स्टेजवर येण्यापासून रोखण्यात आले. अखेर त्यांना बाजूच्या व्यासपीठावरच थांबावे लागले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
रशीद मामू कोण आहेत?
रशीद मामु हे शिवसेना (उबाठा) पक्षाकडून प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवार आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतरच मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला होता. रशीद मामू यांच्या प्रवेशावर केवळ सत्ताधारी पक्षच नव्हे, तर मुख्यमंत्री स्तरावरूनही टीका करण्यात आली होती. विरोधकांनी शिवसेना (उबाठा) नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला होता. समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चावेळी रशीद मामू यांनी दगडफेक घडवून आणली होती, असा आरोप त्यांच्यावर आहे
राशीद मामुंना प्रवेश का नाकरला?
या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी घडलेला हा प्रकार अधिकच चर्चेत आला आहे. मुख्य व्यासपीठावर कोणाची उपस्थिती असावी आणि कोणाची नसावी, यावरून पक्षांतर्गत नाराजीही उघड झाली असल्याचे बोलले जात आहे. वादग्रस्त व्यक्तींमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होण्याची भीती आहे, म्हणूनच कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला, अशी चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही
दरम्यान, या संपूर्ण घटनेवर पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाआधी घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) मधील अंतर्गत समीकरणे पुन्हा एकदा समोर आली आहेत. मात्र उमेदवारांसाठी वेगळे स्टेज निर्माण केलेले आहे त्या ठिकाणी रशीद मामू जाऊन बसले.
मुंबईतील मातोश्रीवर झाला पक्षप्रवेश
छत्रपती संभाजीनगरचे काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. शिवसेना युबीटीचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादान दानवे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला होता.
