लांजा-राजापूर मतदारसंघातून तीन वेळचे आमदार राजन साळवी यांचा यंदाच्या विधानसभा मतदारसंघात किरण सामंत यांनी पराभव केला. झालेल्या पराभवाला विनायक राऊत जबाबदार असल्याचे साळवी यांनी मातोश्रीवरील बैठकीत सांगितले. राऊत यांनी किरण सामंतांना आतून मदत केल्याचा आरोप साळवींनी केला. राजन साळवी यांच्यासोबत तालुका प्रमुख, मुंबई आणि स्थानिक संपर्क प्रमुख उपस्थित होते. विनायक राऊत यांचे उदय सामंत, किरण सामंत यांच्यासोबत व्यावहारिक संबंध असल्याचे राऊत यांनी ठाकरे यांना सांगितले.
advertisement
विनायक राऊत यांनी काय म्हटले?
शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी साळवी यांचे आरोप फेटाळून लावले. विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून राजापूरला प्राधान्य दिले होते असे राऊत यांनी सांगितले. लांजामध्ये पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची, तर राजापूरमध्ये आदित्य ठाकरे यांची सभा घेण्याचा प्रस्ताव होता. मात्र, साळवी यांनी सभा नाकारल्या. निवडणुकीत कोणी सहकार्य करत नाही, अशी त्यांना शंकाकुशंका होती तर 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांना सांगायला हवे होते, असेही शिवसेना ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत यांनी रत्नागिरीमध्ये म्हटले.
नाराजी कायम, साळवींची स्पष्टोक्ती...
मातोश्रीवरील भेटीनंतर राजन साळवी यांनी म्हटले की, 2006 साली पोटनिवडणुकीत पराभव झाला, त्यावेळची कारणे वेगळी होती. पण 2024 च्या निवडणुकीतील पराभवाला जो घटनाक्रम कारणीभूत आहे, त्याबद्दल नाराज होतो आणि नाराज असल्याचे स्पष्ट वक्तव्य साळवी यांनी केले. पराभवाच्या कारणांबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. याबाबत आता ते योग्य तो निर्णय नक्की घेतील, असे राजन साळवी यांनी म्हटले.
