उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला शिवसेना पक्षाचा विरोध असेल, अशी स्पष्ट भूमिका मांडत कुंभमेळा काळातील खर्चाच्या नियंत्रणामुळेच पालकमंत्रिपदावर तोडगा निघत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच राज्यसभेने काढलेल्या संसद सदस्यांच्या वर्तणूक आणि सभागृहाचा शिष्टाचारासंबंधी परिपत्रकावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत मोदी सरकारला सुनावले.
advertisement
आमचे खासदार सभागृहात वंदे मातरम म्हणणारच... फक्त निलंबनाची कारवाई करून दाखवावी
संसद सदस्यांनी यापुढे सभागृहात थँक्यू, जय हिंद, वंदे मातरम म्हणायचं नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खरे तर हे अनाकलनीय आहे. इस देश में रहेना होगा-तो वंदे मातरम कहेना होगा... असे भाजप म्हणायचे. मग आता भाजपला काय झाले आहे? सभागृहात वंदे मातरम म्हणायचे नाही, असा नियम काढला आहे. हे कसले राष्ट्रप्रेम? आता पाकिस्तानात कोण जाणार, कुणाला पाठवायचं? आपल्या सभागृहात आपणच वंदे मातरम म्हणायचं नाही? मॅकॉलेची अवलाद भाजपमध्ये कुठून आली? अशी बोचरी टीका करीत आमचे खासदार वंदे मातरम म्हणणारच. कोण आपल्याला बाहेर काढतंय, बघूयात... असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच भाजपमध्ये हिम्मत असेल तर आमच्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करून दाखवा, असे आव्हानही ठाकरे यांनी भाजपला दिले.
