उज्ज्वला थिटे यांना अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाचं तिकीट दिल्यानंतर त्या मागील काही दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र त्यांनी उमेदवारी भरू नये, येथील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप नेते राजन पाटील प्रयत्न करत असल्याचा आरोप थिटे यांनी केला. अर्ज भरायला जाताना रस्त्यावर पाटील यांनी जागोजागी लोकांना उभं केलं आहे. उसाचे ट्रॅक्टर लावून रस्ता अडवला जात आहे. तसेच राजन पाटील यांच्याकडून आपल्यावर हल्ला केला जाऊ शकतो, अशी भीती थिटे यांनी व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी पोलीस संरक्षण देखील मागितलं होतं.
advertisement
आता अखेर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे पोलीस संरक्षणात अनगरला पोहोचल्या. भाजप नेते राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांकडून थिटे यांना संरक्षण देण्यात आले. उज्ज्वला थिटे सोमवारी पहाटे 5 वाजता अनगर नगरपंचायतीत दाखल झाल्या.
सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून त्यांना शस्त्रधारी पोलीसांचं संरक्षण दिलं आहे. खरं तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपकडून राजन पाटील यांनी सून प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न राजन पाटील यांचा आहे. त्यामुळेच ते थिटे यांना उमेदवारी अर्ज भरण्यात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उज्ज्वला थिटे आपला उमेदवारी अर्ज भरू शकतात की नाही हे पाहणे महत्वाचं आहे.
