जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील एकाच भागात राहणारे 13 तरुण मागील आठ दिवसापासून उत्तराखंड येथे देवदर्शनाला गेले होते. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील 13 तरुणांसोबत मागील 24 तासापासून संपर्क न झाल्यामुळे संपूर्ण गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे. महिलांसह पालकांच्या डोळ्यात चिंतेचे अश्रू असून आमच्या मुलांसोबत लवकरात लवकर संपर्क प्रशासनाने करून द्यावा, अशी मागणी बेपत्ता तरुणांच्या नातेवाईकांनी केली आहे.
advertisement
पुण्यातील 24 जण बेपत्ता
आंबेगाव तालुक्याच्या अवसरी खुर्द गावातील 24 नागरिक अडकले असल्याची माहिती मिळत आहे. मागील 24 तासांपासून या नागरिकांशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र चिंता आणि अस्वस्थता आहे. अवसरी खुर्द येथील श्री भैरवनाथ विद्यालयातील सन 1990 च्या इयत्ता दहावीच्या बॅचचे 24 वर्ग मित्र व वर्ग मैत्रिणी तीर्थयात्रेसाठी उत्तराखंड येथे गेले होते.
गंगोत्रीकडे निघालो असा शेवटचा मेसेज
उत्तरकाशी येथील घटना घडण्यापूर्वी यातील काही लोकांनी "आम्ही गंगोत्रीकडे निघालो" असल्याचे स्टेटस ठेवले होते. मात्र हाच त्यांच्याकडून मिळालेला शेवटचा संदेश असून त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, गंगोत्रीतील सर्व यात्रेकरू सुरक्षित आहेत,मात्र ढगफुटीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने संपर्क होऊ शकलेला नाही.
पालकांच्या डोळ्यात चिंतेचे अश्रू
महिलांसह पालकांच्या डोळ्यात चिंतेचे अश्रू असून सर्व तरुण सुखरूप परत यावे म्हणून सर्व ग्रामस्थ परमेश्वर चरणी प्रार्थना करीत आहे. बेपत्ता तरुणांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांशी संवाद साधला आहे.