नेमकं काय घडलं?
नारायणलाल रावलं असं पीडित ज्वेलर्सचं नाव असून डोंबिवली परिसरात त्यांचं ज्वेलर्स दुकान आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी वैशाली जाधव नावाच्या एका महिलेने रावल यांच्या दुकानात जाऊन दागिन्यांची ऑर्डर दिली होती. रावल यांनी अॅडव्हान्स रक्कम मागितल्यावर या महिलेने त्यांचा मोबाईल नंबर घेतला आणि तिची मुले अॅडव्हान्स रक्कम देतील, असं सांगितलं.
advertisement
या भेटीनंतर तब्बल बारा दिवसांनी, म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने रावल यांना फोन केला आणि अॅडव्हान्स देण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर बोलावून घेतले.
ओलीस ठेवून बेदम मारहाण
रावल हे दिलेल्या पत्त्यावर पोहोचले असता, त्या घरात दोन अनोळखी तरुण उपस्थित होते. त्यांनी आई थेरपीसाठी बाहेर गेल्याचे सांगून रावल यांना घरात घेतले. रावल घरात येताच, त्या दोन पुरुषांनी घराचा दरवाजा बंद केला, बाहेरचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज वाढवला आणि रावल यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्यानंतर त्यांनी रावल यांना दोरीने घट्ट बांधून ओलीस ठेवले.
दरोडेखोरांनी रावल यांच्या जवळ असलेले ३ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज लुटला आणि त्यानंतर ते तिघेही (दोन पुरुष आणि त्यांची साथीदार महिला) घटनास्थळावरून पसार झाले.
पोलिसांत गुन्हा दाखल
दरोडेखोरांनी पळ काढल्यानंतर रावल यांनी स्वतःची कशीबशी सुटका केली आणि थेट मानपाडा पोलीस स्टेशन गाठले. नारायणलाल रावल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात पुरुष आणि संबंधित महिलेविरोधात दरोड्याचा गुन्हा नोंदवला आहे. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके वेगाने तपास करत असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली आहे.
