पुण्यात ठाकरे गटाच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यात वसंत मोरेंचा देखील समावेश होता. वसंत मोरे हे पुण्याच्या प्रभाग क्रमांक ३८ मधून निवडणुकीच्या मैदानात होते. त्यांचा भाजपच्या संदीप बेलदरे यांनी १०११ मतांनी पराभव केला. फायरब्रँड नेता म्हणून ओळख असलेल्या वसंत मोरेंचा अशाप्रकारे पराभव झाल्याने शहरात एकच चर्चा सुरू झाली. या सगळ्या घडामोडीनंतर वसंत मोरेंनी निवडणूक आयोगाचा कथित घोळ समोर आणला आहे.
advertisement
त्यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहून प्रभाग क्रमांक ३८ मधील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मतदानाच्या दिवशी जाहीर केलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षात मोजलेली मतं, यातील तफावत वसंत मोरेंनी बाहेर आणली आहे. याबाबत निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, अशी मागणीही त्यांनी केलं.
वसंत मोरेंनी फेसबूक पोस्टमध्ये नक्की काय म्हटलं?
वसंत मोरे फेसबूक पोस्टमध्ये म्हणाले, "निवडणुकीचा निकाल लागला तो जनतेचा कौल नसताना, आम्ही काही अंशी तो मान्य करतोय. पण निवडणूक निर्णय अधिकारी सौ. करमरकर मॅडम यांनी मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त पुणे मनपा यांना मतदानाच्या दिवशी रात्री १०:००वा. प्रभाग क्रमांक ३८ ची एकूण मतदान करणाऱ्याची संख्या ७९ हजार ८२६ इतकी जाहीरपणे सांगितली होती. मात्र मतदान मोजणीचे दिवशी ७८ हजार ७१८ इतकीच मते का मोजण्यात आली? म्हणजे ११०८ मते कमी कशी काय झाली? याच करमरकर मॅडम यांच्या अधिकारातील प्रभाग ३६ आणि प्रभाग ३७ मधील मतदान आधीच्या दिवशी जाहीर केलेल्या मतदानापेक्षा वाढले असताना फक्त प्रभाग ३८ मधीलच मतदान ११०८ ने कमी कसे काय होते आणि नेमकी मला १०११ मतेच कमी पडतात ? याचं उत्तर प्रशासनाला द्यावेच लागेल."
