नागपूरात भाजप स्वबळावर
नागपूर जिल्ह्यातील 27 ठिकाणी होत असलेल्या निवडणुकीत भाजपने बहुतांश ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. पारशिवनी वगळता इतर सर्व ठिकाणी भाजप एकटी लढत आहे. पारशिवनीमध्ये मात्र महायुतीकडून शिवसेनेचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभा आहे. दुसरीकडे, नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीतही एकी राहिलेली नाही. काँग्रेस स्वबळावर रिंगणात उतरली आहे, तर महाविकास आघाडीमधील इतर पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवत आहेत.
advertisement
उमेदवारांची पळवापळवी
कामठीमध्ये तर वेगळेच चित्र दिसत आहे, जिथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) असा थेट आणि अत्यंत चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे. विदर्भातील या स्थानिक इलेक्शन्समध्ये उमेदवारांची पळवापळवी हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. गोंदिया आणि भद्रावतीमध्ये भाजपने नगराध्यक्ष पदासाठी उभे केलेले उमेदवार शिवसेना (शिंदे गटाने) पळवून त्यांच्याच चिन्हावर उभे केले आहेत. याशिवाय, यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी दिलेला उमेदवार देखील शिवसेनेनं (शिंदे गट) पळविल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे काँग्रेसला मोठा सेटबॅक बसला आहे.
वाद पक्षश्रेष्ठींकडे पोहचला
दरम्यान, भंडारा जिल्ह्यामध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष (भाजप, शिव सेना-शिंदे गट, आणि राष्ट्रवादी-अजित पवार गट) एकत्र न येता स्वबळावर लढत आहेत, ज्यामुळे येथेही त्रिकोणीय लढती पाहायला मिळतील. वर्ध्याच्या आर्वी इथल्या नगर पालिकेच्या निवडणूकीपूर्वीच काँग्रेस मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. काँग्रेस प्रदेशाचे पदाधिकारी शैलेश अग्रवाल व नव्यानेच काँग्रेसमध्ये आलेल्या बाळा जगताप यांच्यात एबी फॉर्म पळविल्याच्या आरोप प्रत्यारोपावरून चांगलीच जुंपलीय. यांचा वाद पक्षश्रेष्ठींकडे पोहचला असून पक्ष नेतृत्व काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे.
