भोंदूबाबा अशोक खरातमुळे नाशिक सध्या चर्चेत असताना आता नाशिक शहरातील सातपूर परिसरात व्यावसायिकाच्या सेक्स स्कॅन्डलमुळे पुन्हा चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे व्यावसायिकाच्या ऑफिसमध्ये कामाला असलेल्या व्यक्तीनेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला पोलिसांनी या खंडणीखोरांना वेळीच ताब्यात घेतल्यानं व्हिडीओ व्हायरल होण्यापासून व्यावसायिक वाचला आहे, या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
advertisement
हार्ड डिस्क चोरीला!
सातपूर पोलीस ठाण्यात २ दिवसांपूर्वी एका व्यक्तीने हार्ड डिस्क चोरी झाल्याची फिर्याद दाखल केली होती. प्राथमिक तपासात फिर्यादीकडे काम करणाऱ्या व्यक्तीनेच हार्ड डिस्क चोरी केल्याचे उघड झाले. चोरीनंतर हार्ड डिस्कमधील सुमारे 100 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओंच्या आधारे फिर्यादीला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचे समोर आलं. पोलिसांनी कारवाई करत ब्लॅकमेलिंग करणाऱ्या चार संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून दोन पेनड्राईव्ह आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
100 हून अधिक महिलांचे व्हिडीओ
या हार्ड डिस्कमध्ये 100 हून अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे व्हिडीओ २००३ ते २०२४ या कालावधीत तयार करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संशयितांनी सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी केली होती, सदर व्यावसायिक तथा फिर्यादीने त्यांची ही मागणी पूर्ण केली होती. मात्रस नंतर ही रक्कम वाढवत तब्बल १२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एक जण फिर्यादीकडे पूर्वी कामाला होता आणि काही काळानंतर पुन्हा कामावर रुजू झाल्याचेही तपासात समोर आलं आहे. संबंधित फिर्यादी स्वतःला पत्रकार म्हणून सांगत असला तरी तो महिलांना उद्योग सुरू करून देण्यासाठी कन्सल्टंट म्हणून काम करत असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.
व्यावसायिक होता पार्ट जाईम ज्योतिषी
सदर व्यावसायिक हा देखील पार्ट टाईम ज्योतिष बघण्याचं काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्या दृष्टीने पोलीस देखील माहिती घेत आहे. मात्र, असं फसवून कोणी महिलांवर अत्याचार करत असेल तर पीडित महिलांनी समोर यावं आम्ही त्यांना समुपदेशन करू, असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आलं आहे. पीडित महिलांच्या पाठीशी आम्ही उभे राहून त्यांना न्याय मिळवून देऊ, अशी प्रतिक्रिया अंनिसचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी दिली.
महिलांनी पुढे येऊन माहिती देण्याचं आवाहन
हार्ड डिस्कमधील व्हिडीओंमध्ये अनेक महिलांचा सहभाग असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील पीडित महिलांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, त्यामुळे संबंधित महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. जर पीडित महिला समोर आल्या तर या व्यावसायिकावर देखील गुन्हा दाखल करून चौकशी केली जाईल, असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण पाठोपाठ नाशिकमधील व्यावसायिकाच्या या सेक्स स्कॅन्डलमुळे सोशल मीडियावर खरात पॅटर्न 2 ची चर्चा जोरदार होत आहे.
