विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की, आज सकाळी ६.५७ वाजता विधान भवनाला बॉम्ब, क्षेपणास्त्राने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आला होता. त्याशिवाय, मुंबई हायकोर्ट, मेट्रो, बँका, शेअर बाजारही उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असल्याची माहिती प्रा. राम शिंदे यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
advertisement
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विधीमंडळ कार्यालयाला एक ईमेल मिळाला. या ईमेलमध्ये विधान भवनाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. अधिवेशन काळात विधान भवन उडवून देणार असल्याची धमकी देण्यात आली. धमकीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. विधीमंडळात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने इमारतीबाहेर काढण्यात आले असून, बाहेरून येणाऱ्या लोकांना गेटवरच रोखण्यात आले आहे.
श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथक दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी विधान भवनाचा ताबा घेतला आहे. इमारतीच्या परिसरात सध्या श्वान पथक (Dog Squad) आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) दाखल झाले असून प्रत्येक मजल्याची आणि कोपऱ्याची कसून तपासणी केली जात आहे.
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे आमदार, अधिकाऱ्यांसह सामान्य कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी असते. अशातच बॉम्बची धमकी आल्याने मुंबई पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. विधान भवनात प्रवेश करण्यापासून पोलिसांनी सगळ्यांना थांबवले आहे. शोध मोहीम पूर्ण झाल्यानंतरच प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
