वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये ही घटना घडली होती. हिंगणघाट येथील इंदिरा वार्ड परिसरात 20 दिवसापूर्वी सुभाष लक्ष्मण वैद्य त्यांची बायको माधूरीसोबत रहावयास आले होते. या दरम्यान सुभाष वैद्य यांचे त्याच्या बायकोसोबत सतत वाद होते. एक दिवशी हा वाद इतका टोकाला गेला की सुभाष वैद्य यांनी धारदार शस्त्राने बायकोची हत्या केली. या घटनेनंतर नवऱ्याने बायकोचा मृतदेह घराबाजूला असलेल्या खड्ड्यात पुरला होता. दृष्यम सिनेमात देखील अशाच प्रकार घडला होता. त्यामुळे त्याचीच कॉपी करत आरोपीने मृतदेह पुरल्याचे समजते.
advertisement
विशेष म्हणजे इतक्या मोठ्या घटनेनंतर तो अजिबात घाबरला नाही याउलट त्याने थेट पोलीस स्टेशन गाठत बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीच्या बायकोचा शोध सूरू केला होता. या दरम्यान पोलीस सर्वत्र तपास करीत असताना सुभाष वैद्य यांची देखील चौकशी करीत होती. या चौकशी दरम्यान पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना सुभाष वैद्य योग्य उत्तर देत नसल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय बळावला होता. तसेच मृतक पत्नी माधुरीच्या नातेवाईकांना देखील नवऱ्यांवर संशय होता.त्यामुळे पोलिसांनी नवऱ्याच्या अवतीभोवतीच तपासाची चक्रे फिरवली होती.
दरम्यान तपासात पोलिसांना काही दिवसांपूर्वी घराजवळ जेसीबीच्या साहाय्याने खोल खड्डा केल्याची माहिती मिळाली होती.पण हा इतका खोल खड्डा कशासाठी खोदण्यात आला? याची पोलिसांनी चौकशी सूरू केली होती.यावेळी पोलिसांनी ज्याने हा खड्डा खोदून काढला त्या जेसीबी मालकाला हुडकून काढलं होतं.जेसीबी मालकाने सदर खड्डा आपणच खोदल्याची कबुली दिली.तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी खोदल्याचे त्यांनी सांगितले.पण खड्डा का व कुणी बुजवला हे मात्र माहिती नसल्याचे तो म्हणाला.त्यामुळे पोलिसांना संशय आणखीणच बळावला.
त्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक चमू व डॉग स्कॉड च्या माध्यमातून शोध लावला.खड्डा पुन्हा खोदल्यावर त्यामध्ये मृतदेह आढळला आहे.त्यामुळे नवऱ्याचं सगळं पितळ उघडं पडलं. आता पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुभाषच्या मामाला ताब्यात घेतले आहे. आणि सुभाष वैद्य फरार आहेत. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. या घटनेने वर्धा हादरलं आहे.