पुरस्थितीने घरांत शिरलं पाणी:
पाऊस इतका मुसळधार होता की, सेलू तालुक्यातील रेहकी गावात पुरस्थिती निर्माण झाली आहे. काही घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचा निवारा गेला, अशी कुटुंब रस्त्यावर आली आहेत. तर या कुटुंबांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. फक्त रहिवाशी भागालाच नव्हे, तर शेती आणि पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक जोर धरलेली पीकं खरडून गेली आहेत. त्यामुळे पाऊसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. तसेच खरडून गेलेल्या पिकांचं आर्थिक नुकसान देखील झेलावं लागणार आहे.
advertisement
नुकसान भरपाईची मागणी: या घटनेनंतर जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा गावांमध्ये पोहोचली आहे. काही नागरिकांची सुटका तर काहींचं स्थलांतर सध्या सुरू आहे. नागरिकांच्या घरातीलं धान्य आणि इतर साहित्याचं देखील मोठं नुकसान झालं आहे. शेती पिकांचं नुकसान आणि इतर साहित्याचं नुकसान असा सर्व्हे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
आता प्रशासन किती वेगाने हे पंचनामे करतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच नागरिकांना लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकरी वर्गात एकिकडे पाऊस पडल्याने आनंद असला तरी झालेल्या नुकसानामुळे बळीराजाचा चांगलाच हिरमोड झाला आहे. त्यामुळे कही खुशी कही गम असं वातावरण जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.
