धुळे, परभणी, निफाड या तीन जिल्ह्यांमध्ये अजूनही तापमानाचा पारा खाली घसरलेलाच आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये विकेण्डला थंडी कायम राहणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही दिवस उरले असताना, संपूर्ण उत्तर आणि ईशान्य भारतात हवामानाने रौद्र रूप धारण केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये १ जानेवारी २०२६ पर्यंत दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतातील या बदलत्या हवामानाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या तापमानावरही उमटण्याची शक्यता आहे.
advertisement
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर राजस्थान आणि झारखंडमध्ये सध्या Cold Wave ची स्थिती आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये दाट धुके असल्याने दृश्यमानता कमालीची घटली आहे. या भागात सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय असून, आगामी ३० डिसेंबरपासून हिमालयीन पट्ट्यात पुन्हा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. या बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग वाढणार असून, त्याचे परिणाम मध्य भारतासह महाराष्ट्रातही जाणवतील.
महाराष्ट्रात सध्या किमान तापमानात मोठी घट झालेली नसली, तरी उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे येत्या ७२ तासांत विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पारा घसरण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार, आगामी ४-५ दिवसांनंतर किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होऊ शकते, मात्र तोपर्यंत थंडीचा कडाका कायम राहील. विशेषतः पहाटेच्या वेळी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये धुक्याची चादर पाहायला मिळू शकते.
उत्तर भारतात दाट धुक्यामुळे विमान सेवा, रेल्वे आणि महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिल्ली, अमृतसर आणि लखनौकडे जाणाऱ्या विमानांना उशीर होत आहे, ज्याचा थेट फटका मुंबई आणि पुण्यातील प्रवाशांना बसू शकतो. जर तुम्ही नवीन वर्षाच्या सुट्ट्यांसाठी उत्तर भारतात जाण्याचे नियोजन करत असाल, तर धुक्यामुळे प्रवासात विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊनच नियोजन करावे. दाट धुक्यामुळे रस्ते अपघातांचा धोका वाढतो, त्यामुळे वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच, वाढत्या थंडीमुळे श्वसनाचे विकार असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
