पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास थांबला असून, आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः 23 ते 29 सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात तयार होणारी कमी दाबाची नवीन प्रणाली लवकरच 'डिप्रेशन'मध्ये रूपांतरित होण्याची शक्यता असल्यामुळे, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात यंदाच्या नवरात्रीच्या सुरुवातीलाच अतिमुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात याची तीव्रता वाढू शकते. त्याचा परिणाम अनेक राज्यांवर होत आहे. कोलकातामध्ये देखील ढगफुटी झाली आहे.
advertisement
सध्याची परिस्थिती आणि आगामी हवामानाचा अंदाज
गेल्या 24 तासांत मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. बीडच्या पाटोदा येथे 150 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय, अहमदनगर, सोलापूर, जळगाव, धाराशिव आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतीतील पिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी, आगामी काळात पावसाचा वाढलेला जोर चिंतेचा विषय बनू शकतो.
हा आठवडा कसं राहणार हवामान?
23 सप्टेंबर: नाशिक, सोलापूर, लातूर, परभणी यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
24 सप्टेंबर: या दिवशी पावसाचा जोर काहीसा कमी होईल, पण पूर्व विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
25 सप्टेंबर: नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
26 सप्टेंबर: पुणे, रायगड, सातारा, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस राहील
27 सप्टेंबर: या दिवशी पावसाचा सर्वाधिक जोर राहणार आहे. पुणे, रायगड, सातारा, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी १५० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
28 सप्टेंबर: मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेला मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे.
शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
हवामान खात्याने दिलेल्या या गंभीर इशाऱ्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
पावसाचा जोर वाढल्यास शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी. हवामान खात्याकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.