देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील, असं भाजपच्या वरिष्ठ नेत्याने पीटीआयसोबत बोलताना सांगितलं आहे. दुसरीकडे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही मुख्यमंत्रिपदाचं नाव निश्चित झालं असून भाजपचे वरिष्ठ नेते यावर शिक्कामोर्तब करतील, असं स्पष्ट केलं होतं. 'पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही वरिष्ठांनी या नावावर शिक्कामोर्तब करण्याची वाट पाहत आहोत', असं रावसाहेब दानवे म्हणाले होते.
advertisement
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार?
दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपचे ज्येष्ठ नेते घेतील, असं रविवारी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. सरकार स्थापनेबाबत महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचंही शिंदे म्हणाले. शिवसेनेला गृहमंत्रीपद आणि श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? या प्रश्नावर महायुतीचे तीनही पक्ष मिळून निर्णय घेतील, असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला, पण एका आठवड्यानंतरही त्यांना सरकार बनवता आलेलं नाही. निवडणुकीत एकट्या भाजपला 132 जागा मिळाल्या, तरीही भाजप सावध पावलं टाकत आहे. याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 5 डिसेंबरला संध्याकाळी आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी होईल, या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहतील, अशी माहिती दिली होती.
