जालना : जालना शहरातील जुना मोंढा परिसरात एका कापड दुकानदाराने केवळ 51 रुपयांत साडी देण्याची आकर्षक ऑफर जाहीर केल्याने सकाळपासूनच दुकानासमोर महिलांची मोठी गर्दी उसळली. स्वस्तात साडी मिळणार या अपेक्षेने शहरातील विविध भागांतून महिला मोठ्या संख्येने येथे दाखल झाल्या. मात्र, गर्दीचे योग्य नियोजन न करता ही ऑफर जाहीर केल्यामुळे परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दुकानदाराला समज दिली.
advertisement
जुन्या मोंढा हा जालना शहरातील गजबजलेला आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी आधीच बाजारपेठेमुळे मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी अत्यल्प किंमतीत साडी देण्याची ऑफर जाहीर झाल्याने काही वेळातच शेकडो महिलांची रांग लागली. गर्दी वाढत गेल्याने रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला, तर दुकानासमोर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही महिलांमध्ये आधी नंबर मिळवण्यासाठी धक्काबुक्कीही झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
पोलिसांची तातडीने घटनास्थळी धाव
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले आणि दुकानदाराला गर्दीचे कोणतेही नियोजन न करता अशी ऑफर जाहीर करणे धोकादायक ठरू शकते, याची जाणीव करून दिली. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या जाहिराती करताना योग्य उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. विशेषतः सणासुदीच्या काळात किंवा बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणी अशा ऑफरमुळे चेंगराचेंगरीसारखी गंभीर घटना घडू शकते, असा इशाराही देण्यात आला.
दुकानदाराचा तात्काळ ही ऑफर बंद करण्याचा निर्णय
पोलिसांच्या समजुतीनंतर संबंधित दुकानदाराने तात्काळ ही ऑफर बंद करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर काही वेळातच गर्दी कमी झाली आणि परिस्थिती पूर्ववत झाली. या घटनेमुळे स्वस्ताच्या आकर्षणापोटी लोकांची मोठी गर्दी कशी उसळू शकते आणि त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कसा निर्माण होऊ शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
[video width="848" height="478" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/02/Jalna-2026-02-ca9a9d861532b7ac27b4d5eefe4b79fa.mp4"][/video]
व्यापाऱ्यांनी व्यवसायिक फायद्यासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे गरजेचे असून, प्रशासनानेही अशा प्रकारच्या जाहिरातींवर योग्य नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. या अगोदर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आला होता. त्यावेळी देखील मोठा गोंधळ उडाला होता.
हे ही वाचा :
