सागर श्रीकांत मंद्रूपकर असं गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुण वकिलाचं नाव आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये सागर मंद्रूपकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन पानांची चिठ्ठी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे. या चिठ्ठीमध्ये सागरने आपल्या आत्महत्येसाठी आपल्या आईला जबाबदार धरले आहे.
सागरने आपल्या वेदना व्यक्त करताना चिठ्ठीत म्हटले आहे की, "आईकडून होणारा सततचा होणारा दुजाभाव यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला ती जबाबदार आहे. माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा, ही नम्र विनंती."
advertisement
सागर मंद्रूपकर यांचे वडील सरकारी नोकरदार असून, त्याची बहीण विवाहित आहे. प्राप्त माहितीनुसार, सागर आणि त्यांच्या आईचे मंगळवारी रात्री कडाक्याचे भांडण झालं होतं. या भांडणानंतर सागरने टोकाचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची नोंद सोलापुरातील सिव्हिल पोलीस चौकी येथे करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
सध्या विजापूर नाका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तरुण वकिलाने आईवर गंभीर आरोप करत आत्महत्या केल्याने सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली असून चिठ्ठीतील आरोपांच्या आधारे विजापूर नाका पोलीस अधिक तपास करत आहेत.
