पुणे : पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयात कृषी पदवीधरामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनाचा विचार करून कृषी अनुभवातून शिक्षण प्रणाली राबवण्यात येत आहे. अभ्यासाचा भाग म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आहे. यामधून महात्मा फुले कृषी महाविद्यालयाला दररोज 12 ते 15 हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. महात्मा फुले कृषी महाविद्यालयात पहिल्यांदाच असा प्रयोग राबवण्यात आला आहे.
advertisement
कशी केली शेती?
महात्मा फुले कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षांतील कृषी पदवी आणि विज्ञान विद्या पदवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये ही लागवड करण्यात आली आहे. स्वीट सेंसेशन, ब्रिलीयन्स, एलीयना, विंटर डॉन, ब्युटी या पाच व्हराइटी यामध्ये आहेत. हा स्ट्रॉबेरीचा प्रकल्प राबवण्याची मूळ संकल्पना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जे. पाटील यांची आहे. त्याच प्रमाणे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल मासाळकर आणि विद्या परिषदेचे कार्यकारी सदस्य भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवला आहे. हा प्रथमच राबवण्यात आला आणि तो यशस्वी देखील झाला आहे.
20 गुंठ्यामध्ये जवळजवळ 10 हजार रोप लावली आहेत. या रोपासाठी 1 लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. मल्चिंग खताचा खर्च 75 हजार रुपये आला आहे. यामधून आता पर्यत 3 लाख 26 हजार रुपये नफा झाला आहे. यातून खर्च जाऊन विद्यार्थ्यांसाठी निव्वळ नफा म्हंटल 1 लाख 51 हजार रुपये शिल्लक आहेत. मार्चच्या शेवटपर्यत याच हर्वेस्टिंग करणार आहोत तर यातून अजून 4 लाखापर्यत अजून उत्पन्न अपेक्षित आहे, असं कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सुभाष भालेकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी लागवडीपासून काम केले आहे. त्याची निगा राखण फळाची काढणी करणं पॅकेजिंग करणं तसेच मार्केटिंग करणं हे काम देखील विद्यार्थीच करतात. त्यामुळे या पिकातून मधून किती पैसे आपण कमवू शकतो. याची कल्पना आता त्यांना आली आहे. त्यामुळे नोकरीच्यापाठी मागे न लागता आपण देखील असे प्रयोग करू शकतो असं त्यांना समजलं, असंही डॉ. सुभाष भालेकर यांनी सांगितले.
farmer success story : एका कल्पनेनं बदललं मजूराचं आयुष्य, आज घरी बसून कमावतोय लाखो रुपये
20 गुंठे जागेमध्ये आम्ही स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. यामुळे आम्हाला स्ट्रॉबेरीच लागवड कशी करावी हे कळालं. रोज स्ट्रॉबेरीची हर्वेस्टिंग केली जाते. यामुळे आम्हाला हर्वेस्टिंग कसं करावं, मार्केटिंग कसं करावं तसेच नवीन रोप घेतले तर त्याची लागवड कशी करावी या सर्व गोष्टी यामधून शिकायला मिळत आहे. यामुळे निश्चितच पुढे याचा उपयोग होईल, अशी माहिती विद्यार्थी अथर्व अवटी याने दिली आहे.





