जालना: शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध असतात. मात्र काहीजण गावात राहूनच उत्पन्नाचे वेगवेगळी फंडे शोधत असतात. त्यातून भरघोस कमाई देखील होत असते. जालना जिल्ह्यातील पिरकल्याण येथील घोडके दांपत्य हे त्यापैकीच एक आहे. संगीता घोडके व अर्जुन घोडके यांनी गावातच दालमिल उद्योग उभारला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना तूर व हरभऱ्याची डाळ तयार करून दिली जाते. तसेच डाळ विक्रीतूनही ते लाखोंची कमाई करत आहेत. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
संगीता घोडके या पिरकल्याण येथील रहिवाशी असून उमेद अभियानाच्या माध्यमातून त्या वेगवेगळी कामे करतात. त्यांच्याकडे दालमिल उद्योगाबरोबरच द्राक्ष शेती, गोड्या पाण्यातील मत्स्य पालन, शेळीपालन असे व्यवसाय आहेत. या सर्व व्यवसायांच्या माध्यमातून त्या वर्षाकाठी 10 लाख रुपयांचे उत्पन्न कमवतात. त्यांचा दालमिल व्यवसाय हा केवळ चार महिने असतो, असे संगीता घोडके सांगतात.
ना गाडी ना बंगला, दाम्पत्यानं दीड एकर जमीन विकली अन् गावासाठी बांधली 205 शौचालयं!
4 महिन्यात लाखाची कमाई
शेतकऱ्यांना 800 रुपये प्रति क्विंटल या दराने तुरीपासून डाळ तयार करून दिली जाते. या माध्यमातून त्या केवळ चार महिन्यांमध्ये एक लाख रुपये निव्वळ उत्पन्न कमावतात. तर स्वतः तूर खरेदी करून त्यापासून डाळ निर्मिती करून त्याची विक्री करतात. यातून देखील त्यांना एक लाखांचा निव्वळ नफा होतो. अशा पद्धतीने केवळ तीन ते चार महिन्याच्या कामातून त्या दोन लाखाचा नफा कमवतात. या सर्व कामात पती अर्जुन घोडकेही मदत करतात.
170 क्विंटल डाळ निर्मितीचे उद्दिष्ट
“माझ्याकडे वेगवेगळे व्यवसाय आहेत. ग्रामीण भागात उद्योगाच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध असल्या तरी या संधींचा शोध घेऊन योग्य दिशेने काम केलं तर चांगला उद्योग उभारता येतो. मला डाळीसाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स येत आहेत. त्यामुळे यंदा तब्बल 70 क्विंटल डाळ तयार केलीये. तर अजून 170 ते 180 क्विंटल दाळ निर्मितीचे उद्दिष्ट आहे, असे संगीता घोडके यांनी सांगितलं.