मुंबई: एखाद्या महिलेनं ठरवलं तर तिच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. मुंबईतील एका गृहिणीने एका शिलाई मशीनपासून सुरू केलाला प्रवास आता एका चांगल्या व्यवसायात रुपांतरीत झालाय. हातात कला, डोळ्यात मोठी स्वप्नं आणि पतीचा भक्कम पाठिंबा असल्याने मनीषा चिकणे यांनी मोठं यश मिळवलंय. कधीकाळी शिलाई क्लासची फी भरण्यासाठीही आर्थिक संकटांना सामोरं जावं लागणाऱ्या मनीषा यांनी लोकल18 सोबत बोलताना आपल्या प्रवासाबद्दल सांगितलं.
advertisement
मुळच्या गृहिणी असणाऱ्या मनीषा यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता. हातात कला असल्याने शिलाई काम शिकण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला क्लासला भरण्यासाठी पैसे देखील नव्हते. परंतु, पतीच्या पाठिंब्याने त्यांनी शिलाई क्लास पूर्ण केला. घरबसल्या ब्लाउज शिवायला सुरुवात केली. सुरुवातीला महिलांना मोफत ब्लाउज शिवून दिले. तिच्या कामातील बारकावे आणि गुणवत्ता पाहून हळूहळू ग्राहक तयार झाले.
Success Story : घरात बसून काम नव्हतं, गृहिणीनं निवडलं आवडीचं क्षेत्र, आता दुसऱ्यांना देतात रोजगार!
एकदा मनिषा यांचं काम पाहिलं की ग्राहक पुन्हा परत यायचे. त्यानंतर कामाची मागणी वाढली आणि एक दिवस त्यांनी दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. भीती होती, पण आत्मविश्वास आणि जिद्द यांच्यामुळे त्यांनी काही रक्कम साठवून छोटंसं दुकान सुरू केलं. सुरुवातीला केवळ ब्लाउज शिलाई होती, पण नंतर साडीचे गाऊन, घागरा, पंजाबी ड्रेस, कुर्ता अशा विविध प्रकारच्या डिझाईनिंग आणि कस्टम ऑर्डर्स घेण्यास सुरुवात केली.
महिन्याची कमाई लाखापर्यंत
मनिषा यांचं दुकान केवळ एका शिलाई मशीनवर चालत नाही, तर त्यांच्या मेहनतीवर, गुणवत्तेवर आणि ग्राहकांच्या विश्वासावर चालतं आहे. दुकानाची मासिक उलाढाल 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यांनी आता इतर महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिला असून काही पुरुष देखील दुकानात काम करत आहेत.
महिलांसाठी सल्ला
“स्त्रियांनी स्वतःला कधीही कमजोर समजू नये. प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी खास असतं. एक कला असते. ती जोपासली पाहिजे. 'मी जे करेन त्यात यश मिळवेन' असा विश्वास ठेवला पाहिजे,” असं मनिषा चिकणे सांगतात. त्यांचा एक गृहिणी ते व्यावसायिक असा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.