अमेरिका आणि इराणमधील अलिकडच्या लष्करी घटनांमुळे तणाव आणखी वाढला आहे. वृत्तानुसार, श्रीलंकेजवळ एका अमेरिकन पाणबुडीने इराणी युद्धनौकेला लक्ष्य केले, तर तुर्कीच्या दिशेने डागण्यात आलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नाटोच्या हवाई संरक्षण प्रणालींनी रोखले. या घटनांनंतर, मध्य पूर्वेत मोठ्या संघर्षाची शक्यता वाढली आहे, ज्यामुळे तेल पुरवठ्यात संभाव्य व्यत्यय येण्याची भीती निर्माण झाली आहे.
advertisement
सोन्याचा दर काय?
COMEX बाजारात स्पॉट गोल्डचे दर ०.८ टक्क्याने वधारून ५,१७६.६९ डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. तर अमेरिकन सोन्याचे वायदे १ टक्क्याने वधारून ५,१८६ डॉलरवर गेले आहेत. श्रीलंकेजवळ अमेरिकन पाणबुडीने इराणी युद्धनौकेला लक्ष्य केल्याच्या वृत्तानंतर मध्यपूर्वेत मोठ्या युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याकडे वळवला आहे.
भारतीय बाजारपेठेवर परिणाम
जागतिक अस्थिरतेचे पडसाद भारतीय बाजारातही उमटले आहेत. बुधवारी भारतीय बाजारपेठेत सोन्याचे भाव प्रति तोळा सुमारे १.७० लाख रुपयांच्या घरात पोहोचले. चांदीच्या दरातही २.८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत जवळपास २० टक्के वाढ झाली असून, सुरक्षित आश्रयस्थान (Safe Haven) म्हणून सोन्याला मोठी पसंती मिळत आहे.
एक्सपर्ट काय म्हणतात?
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे कमोडिटी रिसर्च प्रमुख हरीश व्ही. यांच्या मते, भू-राजकीय तणाव जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत सोन्यातील तेजी कायम राहील. डॉलर निर्देशांकातील घसरण आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे आगामी व्याजदर धोरण सोन्याच्या भविष्यातील दिशेसाठी अत्यंत कळीचे ठरणार आहेत.
तर, दुसरीकडे बाजारावर अमेरिकेचे व्याज दर धोरणही प्रभाव टाकणार असल्याचे म्हटले जात आहे. फेडरल रिझर्व्ह आपल्या आगामी बैठकीत व्याजदरात कोणताही बदल करणार नसल्याचे संकेत आहेत. अमेरिकन बॉण्ड यील्ड आणि डॉलर निर्देशांक हे सोन्याचे दर ठरवण्यात महत्त्वाचे घटक ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.
