चिनी गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करण्याचे विक्रम मोडले आहेत. वृत्तसंस्था 'ब्लूमबर्ग'च्या मते, गेल्या आठवड्यातच चिनी गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमध्ये सुमारे 7.6 अब्ज युआन (सुमारे 1 अब्ज डॉलर्स) गुंतवणूक केली आहे. चीनच्या गोल्ड ईटीएफ बाजाराच्या इतिहासातील ही सर्वात मोठी साप्ताहिक गुंतवणूक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच चीनमधून येणाऱ्या उत्पादनांवर मोठे शुल्क लादले आहे. यानंतर, जागतिक बाजारपेठेत बरीच उलथापालथ झाली. त्यानंतर गुंतवणूकदार सुरक्षित म्हणून सोन्यात गुंतवणूक केली.
advertisement
विक्रमी गुंतवणूक....
हुआन यिफू गोल्ड ईटीएफमध्ये (Huaan Yifu Gold ETF ) सर्वाधिक वाढ झाली. एकूण गुंतवणुकीच्या 40 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित केली. गोल्ड ईटीएफमध्ये दररोजच्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये सामान्यत: पाच पटीने वाढ झाली. अमेरिकेच्या पावित्र्यानंतर आता सुरू झालेले हे ट्रेड वॉर तात्पुरते नसून दीर्घकाळ हा संघर्ष सुरू राहण्याचा अंदाज बाजारात व्यक्त केला जात आहे.
अमेरिका, चीन आणि इतर देशांच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. शांघाय कंपोझिट इंडेक्स 3 दिवसांत सुमारे 8 टक्क्यांनी घसरला आहे. चीनचा युआन (RMB) देखील कमकुवत झाला, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आणखी डळमळीत झाला.
आतापर्यंतची उच्चांकी गुंतवणूक....
इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी गुंतवणूक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तसंस्था ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, यापूर्वी, 2015-16 मध्ये युआनच्या अवमूल्यनाच्या वेळी, एका महिन्यात सुमारे 2.1 अब्ज युआन गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवले गेले होते. पण यावेळी, फक्त एका आठवड्यात त्याच्या जवळपास तीन पटीने 7.6 अब्ज युआनची गुंतवणूक झाली आहे.
गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे का?
सोन्यातील गुंतवणूक ही मागील अनेक शतकांपासून आर्थिक संकटात सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. सोन्याचे अवमूल्यन कोणतेही सरकार करू शकत नाही, अथवा कोणताही देश त्याच्या मूल्यावर परिणाम करू शकतो. चीनमध्ये ही अमेरिकन बाँड किंवा परदेशी चलनातील गुंतवणूक सुरक्षित समजली जात नाही. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे.
इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा चांगला पर्याय...
सहसा आर्थिक संकट अथवा अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार यूएस ट्रेझरी बाँड किंवा जपानी येन सुरक्षित मानतात. परंतु अमेरिका आणि चीनमधील तणाव पाहता, आता चिनी गुंतवणूकदारांसाठी सोने अधिक सुरक्षित वाटते.
चीनमध्ये गोल्ड ईटीएफ कसे काम करते?
चीनमधील हुआन यिफू गोल्ड ईटीएफ आणि ई फंड गोल्ड ईटीएफ सारख्या मोठ्या गोल्ड ईटीएफने गुंतवणूकदारांना सोन्यात सहज गुंतवणूक करण्याचा पर्याय दिला आहे. भौतिक सोन्याच्या तुलनेत, ईटीएफमध्ये साठवणुकीची समस्या नसते आणि त्यावर कमी कर देखील लागतो (फक्त 0.1 टक्के सिक्युरिटीज व्यवहार कर लागू होतो). पूर्वी लोक दागिने किंवा सोन्याची बिस्किटे, विटा खरेदी करायचे, पण आता तरुण आणि संस्थात्मक गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफमध्ये अधिक गुंतवणूक करत आहेत.
पुढे काय होणार?
अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढत राहिला तर पुढील सहा महिन्यांत गोल्ड ईटीएफमध्ये आणखी 50-60 अब्ज युआनची गुंतवणूक होऊ शकते. चीनमधील वृद्ध लोकसंख्या, मंदीची भीती आणि सोन्याच्या मालकीला सरकारने दिलेले प्रोत्साहन यामुळे हा ट्रेंड कायम राहू शकतो असे म्हटले जात आहे.
सोन्यातील गुंतवणुकीला ब्रेक कसा लागणार?
सोन्यात वाढत असलेल्या गुंतवणुकीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि चीनमध्ये मोठा करार झाला आणि टॅरिफ हटवले गेले तर गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक कमी होऊ शकते. याशिवाय, जर शेअर बाजार पुन्हा स्थिर झाला तर गुंतवणूकदार नफा बुक करू शकतात.
अमेरिकेसोबतच्या वाढत्या तणावामुळे चिनी गुंतवणूकदारांनी सोन्यात वेगाने पैसे गुंतवले आहेत. व्यापार युद्ध लांबण्याची भीती असल्याने हा ट्रेंड सुरूच राहू शकतो, ज्याचा जागतिक सोन्याच्या किमती आणि चीनच्या आर्थिक बाजारपेठांवर मोठा परिणाम होऊ शकतो.