विश्लेषकांच्या मते सोन्याचा दर 1.09 टक्क्यांनी वाढून 3,418.50 डॉलर्स प्रति औंस झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डिसेंबर डिलिव्हरीसाठी सर्वाधिक व्यवहार झालेले कॉमेक्स सोन्याचे वायदे शनिवारी 1.09 टक्क्यांनी वाढून 3,418.50 डॉलर्स प्रति औंसवर बंद झाले.
फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी जॅक्सन होल संगोष्ठीत मौद्रिक धोरणात संभाव्य बदलांचा इशारा दिल्यानंतर ही वाढ झाली. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नव्याने आशावाद निर्माण झाला. पॉवेल यांच्या विधानामुळे असे संकेत मिळाले की- डिसेंबरनंतर पहिल्यांदाच मध्यवर्ती बँक लवकरच व्याजदर कपात करू शकते. अमेरिकेची एफओएमसी बैठक 16-17 सप्टेंबर रोजी होणार आहे.
advertisement
अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्कांचा घरगुती किमतींवर मोठा परिणाम झाल्यास फेडचे अधिकारी यावर्षाअखेरीस दरकपात पुढे ढकलण्याचा विचार करू शकतात,असे पॉवेल यांनी सांगितले.
एंजल वनचे डीव्हीपी – रिसर्च (नॉन-अॅग्री कमोडिटीज आणि करन्सीज) प्रथमेश मल्ल्या यांनी सांगितले की- अलीकडच्या आठवड्यांत सोन्याच्या किमतींमध्ये घट झाली होती कारण बाजारात नवे ट्रिगर्स नव्हते. परंतु पॉवेल यांच्या विधानानंतर सोन्याच्या किमतींना नव्याने उभारी मिळाली आहे. सप्टेंबरमध्ये व्याजदर कपात आणि वर्षाअखेर आणखी एका कपातीची शक्यता आता खूपच वाढली आहे. त्यामुळे एमसीएक्स सोन्यात जोरदार उसळी आली. कारण डॉलर कमकुवत झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वस्त भावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.
जागतिक बाजारात अनिश्चितता कायम आहे. रशिया-युक्रेन शांतता चर्चासत्रे सुरू आहेत. मात्र संघर्षाच्या वास्तविक तोडग्यासाठी अजूनही अनेक अटी व अडथळे आहेत. व्यापार शुल्काच्या बाबतीतही ट्रम्प यांच्या कार्यकाळात हे संकट संपेल असे दिसत नाही, असे मुल्ल्या यांनी स्पष्ट केले.