ओडिशा इथे काम सरकारी कर्मचारी मोटर वाहन निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या गोपाळ चंद्र हांसदा याच्या कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं. सरकारी कामांसाठी तो लोकांकडून पैसे उकळत असल्याची टीप मिळाली होती. त्याच टीपच्या मदतीनं त्याच्या घरावर, कार्यालयाच्या ठिकाणासह 6 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. सरकारी कागदपत्र आणि प्रत्यक्षात जे सापडलं ते व्हेरिफिकेशन केल्यानंतर अधिकाऱ्यांचं डोकंच चक्रावलं.
advertisement
हांसदा कुटुंबाजवळ एकूण 44 प्लॉट आहेत. इतकंच नाही तर एक किलो सोनं, 2.126 किलो चांदी, 1.34 कोटी रुपयांहून अधिक रक्कम असल्याचं तपासातून समोर आलं आहे. 2.38 लाख रुपयांची कॅश देखील जप्त करण्यात आली आहे. याच सरकारी कर्मचाऱ्याने मुलीच्या शिक्षणासाठी एकावेळी 40 लाख रुपये भरल्याचंही समोर आलं आहे.
44 प्लॉट पैकी 43 एकाच शहरात आहेत. ज्याची मार्केट व्हॅल्यू 1.49 कोटींहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. हांसदा यांचं दोन मजली आलिशान घर आहे. या घरासाठी देखील इतका पैसा कुठून आणला याचा प्रश्न अनेकांना पडला होता त्याचं उत्तर अखेर आज मिळालं. 1991 पासून ते सरकारी नोकरी करत आहेत. 2020 पासून RTO ऑफिससाठी त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांचा आताचा पगार साधारण 1 लाख आहे. एक लाखात इतकं सगळं घेणं तर शक्य नाही. मग इतका सगळा पैसे कुठून आणि कसा आला याची चौकशी केली जाणार आहे.
हांसदा यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली जाणार आहे. याशिवाय त्यांच्या बँक खात्यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यांच्या घरातील डायरीतून अनेक खुलासे झाले आहेत. या रेडची चर्चा देशभरात सुरू आहे. सरकारी कर्मचारी आणि पगार इतका असूनही गैरमार्गानं संपत्ती मिळवण्याची हाव गळाला लागली आणि अखेर हांसदा यांच्या घरावर रेड पडली.
