‘डिजिटल अरेस्ट’ या बनावट संकल्पनेवर आधारित फसवणूक सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना अशा भ्रामक कॉल्सपासून सावध राहण्याचा इशारा रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) दिला आहे. या प्रकारात लोकांना घाबरवून आर्थिक माहिती मिळवली जाते आणि मोठ्या रकमेची फसवणूक केली जाते.
RBI च्या जनजागृती मोहिमेअंतर्गत स्पष्ट करण्यात आलं आहे की, "डिजिटल अरेस्ट" सारखी कोणतीही कायदेशीर संकल्पना अस्तित्वातच नाही. त्यामुळे अशा कॉल्सना घाबरून कोणतीही वैयक्तिक किंवा बँक खात्याशी संबंधित माहिती देऊ नये.
advertisement
फसवणुकीचा पद्धत:
फसवणूक करणारे स्वत:ला पोलीस, सरकारी अधिकारी किंवा बँक प्रतिनिधी असल्याचे भासवतात. ते सांगतात की तुमच्यावर आर्थिक गुन्ह्याचा आरोप आहे आणि त्यामुळे डिजिटल अरेस्ट होणार आहे. या दरम्यान पीडितांकडून त्यांची आर्थिक माहिती उकळली जाते किंवा थेट पैसे ट्रान्सफर करायला लावले जातात.
काय करावं?
घाबरू नका: अशा कोणत्याही कॉलला बळी पडू नका.
शेअर करू नका: बँक खाते क्रमांक, OTP, पासवर्ड, आधार क्रमांक यांसारखी माहिती कोणालाही देऊ नका.
पैसे देऊ नका: कोणत्याही दबावाखाली आर्थिक व्यवहार करू नका.
तक्रार करा: अशा कॉल्सबाबत त्वरित cybercrime.gov.in या वेबसाइटवर तक्रार दाखल करा किंवा 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.
RBI च्या 90व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सुरू झालेल्या ‘RBI सांगते – जाणकार बना, सतर्क रहा’ या जनजागृती मोहिमेच्या अंतर्गत ही माहिती देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळ rbikehtahai.rbi.org.in/da येथे भेट देऊन स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती माहिती घ्यावी, असे आवाहन बँकेने केले आहे.