जर तुम्हीही अशा सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल जिथे बाजाराच्या जोखमीची भीती नाही, तर देशातील सर्वात मोठी बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आली आहे.
बचत 7 दिवसांची असो वा 10 वर्षांची
SBI मध्ये तुम्ही अगदी 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी करू शकता. सध्या बँक आपल्या ग्राहकांना 3.05% ते 7.05% पर्यंत आकर्षक व्याजदर देत आहे. विशेषतः ज्यांना कमी कालावधीसाठी पैसे गुंतवायचे आहेत, त्यांच्यासाठी 211 दिवसांची योजना सध्या चर्चेत आहे.
advertisement
211 दिवसांच्या एफडीवर किती मिळणार व्याज?
SBI सध्या 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर विविध गटांनुसार खालीलप्रमाणे व्याज देत आहे:
सामान्य नागरिक: 5.90 टक्के
ज्येष्ठ नागरिक: 6.40 टक्के
अति ज्येष्ठ नागरिक (80 वर्षांवरील): 6.50 टक्के
तसेच, बँकेची अमृत वर्षिता ही 444 दिवसांची विशेष योजना देखील आहे, ज्यावर 7.05 टक्क्यांपर्यंत सर्वोच्च व्याज मिळते.
गणिताने समजून घेऊया: 2 लाखांच्या गुंतवणुकीवर काय मिळेल?
समजा तुम्ही 2 लाख रुपये 1 वर्षासाठी SBI मध्ये ठेवले, तर मॅच्युरिटीच्या वेळी तुमच्या हातात किती रक्कम येईल? याचा हिशोब खालीलप्रमाणे आहे. हा हिशोब SBI Online Calculation नुसार आहे.
सामान्य नागरिकांसाठी :
जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल, तर 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 5.90 टक्केनुसार साधारण 11,800 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच, एक वर्षानंतर तुम्हाला एकूण 2,11,800 रुपये परत मिळतील.
ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen):
60 ते 80 वयोगटातील व्यक्तींना बँकेकडून थोडे जास्त व्याज मिळते. या वयोगटातील व्यक्तीने 2 लाख रुपये गुंतवल्यास 6.40 नुसार त्यांना 12,800 रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीच्या वेळी त्यांना एकूण 2,12,800 रुपये मिळतील.
अति ज्येष्ठ नागरिकांसाठी (Super Senior Citizen):
ज्यांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांना सर्वाधिक व्याज मिळते. 2 लाख रुपयांच्या ठेवीवर 6.50 नुसार त्यांना साधारण 13,000 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे वर्षभरानंतर त्यांच्या हातामध्ये एकूण 2,13,000 रुपये येतील.
थोडक्यात सांगायचे तर तुमचे वय जितके जास्त, तितकाच या योजनेतून मिळणारा परतावाही जास्त असेल. शिवाय तुम्ही जितकी जास्त दिवस पैसे ठेवाल तितका जास्त इंट्रेस्ट आणि रिर्टन मिळेल. 211 दिवसांनंतर सर्वसामान्य व्यक्तीने पैसे काढले तर त्याला दिवसांनुसार 3.05 टक्क्यांपासून मिळेल.
एसबीआयमध्ये गुंतवणूक का करावी?
सरकारी बँक असल्यामुळे तुमची मुद्दल 100 टक्के सुरक्षित राहते. शिवाय, गरजेच्या वेळी तुम्ही या एफडीवर कर्ज किंवा ओव्हरड्राफ्टची सुविधाही घेऊ शकता. जर तुमच्याकडे काही रक्कम काही महिन्यांसाठी शिल्लक असेल, तर ती साध्या बचत खात्यात ठेवण्यापेक्षा 211 दिवसांच्या एफडीमध्ये ठेवणे कधीही फायद्याचे ठरेल.
कमी वेळेत जास्त जोखीम न घेता आपल्या पैशांची वाढ करण्यासाठी SBI चा हा 211 दिवसांचा पर्याय एक स्मार्ट गुंतवणूक ठरू शकतो.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
