मुंबई: काही दिवसांपूर्वी सरकारने GST कर प्रणाली सोपी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला होता. आता गरजेच्या वस्तूंवर 22 सप्टेंबरपासून (उद्यापासून) जीएसटी फक्त दोन स्लॅबमध्ये 5% किंवा 18% आकारला जाणार आहे. यामुळे पनीर, तूप, साबण-शॅम्पू यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंपासून ते AC, कार यांसारख्या वस्तूही स्वस्त होतील.
advertisement
जीएसटी कौन्सिलच्या 56व्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 3 सप्टेंबर रोजी याबाबत माहिती दिली. या बदलासंबंधीची महत्त्वाची माहिती 9 प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात अशी आहे :
प्रश्न 1 : जीएसटी दरांमध्ये नेमका बदल काय?
सरकारने 3 सप्टेंबर रोजी जाहीर केले होते की जीएसटीचे 5%, 12%, 18% आणि 28% असे चार स्लॅब कमी करून आता फक्त 5% आणि 18% असे दोन स्लॅब करण्यात आले आहेत.
याशिवाय तंबाखू, पान मसाला, कार्बोनेटेड ड्रिंक आणि लक्झरी वस्तू जसे मोठ्या कार, यॉट्स आणि वैयक्तिक वापरासाठी विमान यांवर 40% विशेष कर आकारला जाईल.
काही वस्तूंवर, जसे की छेना, पनीर, रोटी, चपाती, पराठा यांवर कोणताही कर लागणार नाही. तंबाखू वगळता इतर सर्व वस्तूंवर नवे दर 22 सप्टेंबरपासून लागू होतील.
प्रश्न 2 : या बदलाचा फायदा की तोटा?
या बदलामुळे साबण-शॅम्पू सारख्या दैनंदिन वस्तू, खाण्यापिण्याच्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक सामान आणि कार स्वस्त होणार आहेत. लाइफ आणि हेल्थ इन्शुरन्सवर लावण्यात आलेला 18% कर देखील आता शून्य झाला आहे. म्हणजेच फायदा होणार आहे.
-सिमेंटवर कर 28% वरून 18% झाला. त्यामुळे घर बांधणे किंवा दुरुस्तीचा खर्च कमी होईल.
-टीव्ही, एसी सारख्या वस्तूंवरचा कर 28% वरून 18% झाला. त्यामुळे त्या स्वस्त होतील.
-33 आवश्यक औषधे, विशेषतः कॅन्सर आणि गंभीर आजारांवरील औषधांवर आता कोणताही कर नाही.
-लहान कार आणि 350 सीसीपर्यंतच्या मोटरसायकलवर 28% ऐवजी 18% कर आकारला जाईल.
-ऑटो पार्ट्स आणि थ्री-व्हीलरवरचा कर 28% वरून 18% झाला आहे.
उदाहरण:
पूर्वी – एका हेअर ऑइलच्या बाटलीची किंमत 100 रुपये आणि 18% जीएसटी असेल तर :
जीएसटी = 100 × 18% = 18
एकूण किंमत = 100 + 18 = 118
नंतर – नवीन जीएसटी 5% असेल तर :
जीएसटी = 100 × 5% = 5
एकूण किंमत = 100 + ₹5 = 105
फायदा : पूर्वी 118 रुपयांची बाटली आता 105 रुपयांत मिळेल. म्हणजेच 13 रुपयांचा फायदा.
प्रश्न 3 : जुन्या स्टॉकवर जास्त MRP असेल तर?
सरकारने स्पष्ट केले आहे की- जुन्या स्टॉकवर जरी जास्त MRP असली तरी तो माल ग्राहकांना नव्या दरांनुसारच मिळणार आहे. कमी झालेल्या जीएसटी दरांचा फायदा ग्राहकांना देणे बंधनकारक आहे.
औषधांसाठी नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने 12 आणि 13 सप्टेंबरच्या आदेशांमध्ये सांगितले आहे की- औषध उत्पादक व विक्रेते कंपन्यांनी औषधे, फॉर्म्युलेशन व मेडिकल डिव्हाइसेसची MRP अपडेट करावी. जीएसटी बदलानंतर नव्या किमतींची यादी डीलर, रिटेलर, राज्य औषध नियंत्रक व सरकारला द्यावी.
प्रश्न 4 : दुकानदार जीएसटी कपातीचा फायदा न दिल्यास काय करावे?
जर दुकानदाराने किंमत कमी केली नाही तर तक्रार करता येईल. दोषी दुकानदारांवर दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो.
-नॅशनल कंझ्युमर हेल्पलाइन 1800-11-4000 वर कॉल करू शकता.
-CBIC ची जीएसटी हेल्पलाइन 1800-1200-232 वरही कॉल करू शकता.
-नॅशनल अँटी प्रॉफिटियरिंग अथॉरिटीच्या वेबसाइटवर तक्रार करता येईल.
-तक्रारीत बिलाची प्रत, दुकानदाराचे नाव व पत्ता देणे आवश्यक आहे.
प्रश्न 5 : लाइफ आणि हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम कमी होईल का?
होय. सरकारने लाइफ आणि हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवरील जीएसटी 18% वरून शून्य केला आहे. 22 सप्टेंबरनंतर भरल्या जाणाऱ्या रिन्युअल प्रीमियमवरही जीएसटी लागणार नाही.
उदाहरण:
फॅमिली हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम = 50,000
18% जीएसटीसह प्रीमियम = 59,000
०% जीएसटीसह प्रीमियम = 50,000
फायदा = 9,000
(ही आकडेवारी फक्त उदाहरणासाठी आहे. प्रत्यक्ष प्रीमियम वेगळा असू शकतो.)
प्रश्न 6 : काही वस्तू महाग होतील का?
होय. शौक व विलासी वस्तूंकरिता 40% चा नवा स्लॅब तयार करण्यात आला आहे. पान मसाला, तंबाखू सारखी उत्पादने यामध्ये आहेत. काही कार आणि बाईक्सवरही 40% कर लागेल. मात्र या गाड्या महाग होणार नाहीत. कारण आधी त्यांच्यावर 28% जीएसटीसोबत 17% सेस लावला जायचा (एकूण 45%). आता तो 40% असेल.
-40% कर लागू होणाऱ्या गाड्या :
-1200 सीसीपेक्षा जास्त इंजिन असलेल्या आणि 4 मीटरपेक्षा मोठ्या पेट्रोल कार.
-1500 सीसीपेक्षा जास्त इंजिन असलेल्या आणि 4 मीटरपेक्षा मोठ्या डिझेल कार.
-350 सीसीपेक्षा जास्त इंजिन असलेल्या मोटरसायकली.
प्रश्न 7 : काही वस्तूंच्या किंमती बदलणार नाहीत का?
होय. जीएसटी 2.0 मध्ये सुमारे 90% वस्तूंच्या किंमती बदलल्या आहेत. पण काही वस्तूंवर करात बदल झालेला नाही.
-0% स्लॅब: ताजी फळे-भाज्या, दूध, खुला पीठ, ब्रेड, रोटी, पराठा – यावर पूर्वीप्रमाणेच शून्य कर राहील.
-5% स्लॅब: इलेक्ट्रिक व्हेईकल्स (EV) जसे इलेक्ट्रिक कार – यावर पूर्वीप्रमाणेच 5% जीएसटी राहील.
-3% स्लॅब: सोने, चांदी, हिरे आणि महागडे दगड – यावर पूर्वीप्रमाणेच 3% कर राहील (विशेष स्लॅब).
-18% स्लॅब: बहुतेक इलेक्ट्रॉनिक्स जसे मोबाइल फोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर – यावर पूर्वीप्रमाणेच 18% कर राहील.
सिन व लग्झरी वस्तू: सिगारेट, तंबाखू उत्पादने (गुटखा, बीडी, पान मसाला) – यावर 28% + कंपनसेशन सेस राहील. नंतर 40% मध्ये शिफ्ट होईल.
प्रश्न 8: हॉटेल बुकिंग, फ्लाइट तिकीट, सिनेमा तिकीट स्वस्त होतील का?
होय.
-हॉटेल रूम, ब्युटी आणि हेल्थ सर्व्हिसेसवर जीएसटी 18% वरून 5% केला आहे.
-100 रुपयांपर्यंतच्या सिनेमा तिकिटांवर कर 12% वरून 5% केला आहे.
-100 रुपयांपेक्षा जास्त तिकिटांवर 18% कर लागेल.
हॉटेल रूम उदाहरण :
पूर्वी – 5,000 रुपयांच्या रूमवर 12% कर = 600
एकूण किंमत = 5,600
आता – 5% कर = 250
एकूण किंमत = 5,250
फायदा = 350
फ्लाइट प्रवास :
इकोनॉमी क्लास – कर 12% वरून 5% (स्वस्त)
बिझनेस क्लास – कर 12% वरून 18% (महाग)
फर्स्ट क्लास – बदल नाही.
प्रश्न 9 : नव्या जीएसटीचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल?
सरकारचा दावा आहे की- जीएसटी 2.0 मुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल. व्यवसाय करणे सोपे होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. 17 सप्टेंबर रोजी विशाखापट्टणम येथे झालेल्या ‘नेक्स्ट जन जीएसटी रिफॉर्म्स’ कार्यक्रमात वित्तमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की या बदलामुळे अर्थव्यवस्थेत सुमारे 2 लाख कोटी रुपये येतील.
मुख्य आर्थिक सल्लागार वी. अनंथा नागेश्वरन म्हणाले की, लोकांच्या हातात जास्त खरेदी शक्ती येईल. ज्यामुळे मागणी-उत्पादनाचा चक्र वेगाने फिरून GDP वाढेल. अर्थतज्ज्ञ आणि एलारा कॅपिटलच्या EVP गरीमा कपूर यांनी सांगितले की- हे रिफॉर्म्स कंझम्प्शन डिमांडला 1%-1.2% ची चालना देतील, ज्यामुळे पुढील 4-6 तिमाहीत GDP ग्रोथ वाढेल.