एकीकडे अमेरिका अस्वस्थ आहे, तर दुसरीकडे इराण मात्र हे युद्ध लांबवण्यासाठी सर्वशक्ती पणाला लावत आहे. पण इराणला हे युद्ध संपवायचं का नाहीये? असा प्रश्न जगाला पडला आहे, पण खरं पाहाता यामागे इराणची एक अशी 'डेंजरस' रणनीती आहे, जिथे तो शत्रूचा पराभव तलवारीने नाही, तर त्याच्या रिकाम्या होत जाणाऱ्या खजिन्याने करू इच्छितो.
advertisement
इराण सध्या 'एट्रिशन' (Attrition Strategy) या तत्त्वावर काम करत आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, शत्रूला इतकं थकवायचं की तो स्वतःहून गुडघे टेकवेल. इराणला माहित आहे की अमेरिकेचे आणि इस्रायलचे शस्त्रास्त्र खूप महागडे आहेत. इराणने आपले स्वस्त ड्रोन आणि मिसाइल्स वापरून अमेरिका-इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेला कामाला लावलं आहे.
गणिताचा हा खेळ समजून घ्या:
इराणचा स्वस्त ड्रोन: किंमत साधारण 45 लाख रुपये.
या एका ड्रोनला हवेतच संपवण्यासाठी अमेरिका किंवा इस्रायलला जे 'पॅट्रियट' किंवा 'थाड' क्षेपणास्त्र सोडावं लागतं, त्याची किंमत आहे तब्बल 27 कोटी रुपये.
पेंटागनच्या अंदाजानुसार, युद्धाच्या पहिल्या दोन दिवसांतच अमेरिकेने 5.6 अब्ज डॉलर्सचे दारूगोळा खर्च केले आहेत. इराणला हेच हवं आहे. शत्रूची आर्थिक कंबर तोडणं.
इराणने होर्मुजची सामुद्रधुनी बंद करून जगाच्या तेलाची नळीच आवळली आहे. त्यातच आता इराणचे लक्ष 'बाब अल मंदेब' (Bab al-Mandab) या जलमार्गावर आहे. हा मार्ग येमेन आणि जिबूती दरम्यान असून दरवर्षी 20,000 पेक्षा जास्त जहाजे येथून जातात.
जर इराणने हा मार्गही रोखला, तर आखाती देशांतून बाहेर पडणारा तेलाचा शेवटचा मोठा रस्ताही बंद होईल. यामुळे जगाचा श्वास कोंडण्याची शक्यता आहे.
या युद्धाच्या धामधुमीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक चक्रावून टाकणारं विधान केलं आहे. ते म्हणतात की, "होर्मुज बंद होण्याने अमेरिकेला फायदाच आहे." त्यामागचं कारण असं की, अमेरिका आज जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. तेलाच्या किमती वाढल्या की अमेरिकेचा नफा वाढतो. पण दुसरीकडे, अमेरिका आपले अब्जावधी डॉलर्स या युद्धात जळताना पाहून आतून हादरला ही आहे.
इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामनेई यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे अमेरिकेला धमकी दिली आहे. "आम्ही शत्रूकडून भरपाई घेऊ आणि बदलाही घेऊ," असे त्यांनी ठणकावून सांगितले. इराणचे संसदेचे सभापती मोहम्मद बाकेर कालीबाफ यांनीही स्पष्ट केले की, हे युद्ध आता इराणच्या अस्तित्वाची लढाई बनली आहे.
इराणने होर्मुजची गली धरून युद्धाच्या मानेची नळी धरली आहे. हे युद्ध जितकं लांबेल, तितकं अमेरिका आणि इस्रायलचं आर्थिक नुकसान मोठं असेल. पण या दोन महाबळींच्या लढाईत सामान्यांच्या डिझेल आणि गॅसचे भाव कुठे जाऊन पोहोचतील, हीच खरी चिंतेची बाब आहे.
